कालच राज्यात आणि राज्याबाहेरही आपल्या लाडक्या गणपतीबाप्पाला निरोप देण्यात आला आहे. बाप्पाला आवडणारे मोदक, लाडू यांना या काळात चांगलीच मागणी असते. हैद्राबादच्या जवळ असणाऱ्या बाळापूर या गावात एका गणपतीचा प्रसाद असणाऱ्या ला़डूचा लिलाव झाला आहे. विशेष म्हणजे या लिलावात लाडूला थोडीथोडकी नाही तर तब्बल १६.६० लाख रुपये किंमत आली आहे. त्यामुळे लाडूच्या लिलावाचे मागील २५ वर्षातील सगळे रेकॉर्ड तुटले आहेत. हा गणपती येथील अतिशय प्रसिद्ध गणपती असून त्याच्या लाडूचा दर्वर्षी मोठा लिलाव करण्यात येतो. श्रीनिवास गुप्ता यांनी यावर्षी हा लाडू १६ लाख ६० हजार रुपयांना घेतला.

२०१७ मध्ये या लाडूची किंमत १५.६० लाख होती तर २०१६मध्ये १४.६५ लाखांचा लिलाव झाला होता. या लाडूचे वजन २१ किलो असून १९९४ पासून या लाडूचा गणेश विसर्जनाच्या वेळी लिलाव करण्यात येतो. १९९४ मध्ये या लाडूचा ४५० रुपयांत लिलाव झाला होता. या लाडूचा लिलाव जिंकल्यानंतर गुप्ता म्हणाले, आतापर्यंत जेवढे लोक हा लाडू जिंकले ते यशस्वी झाले आहेत, त्यामुळे मीही यशस्वी होईन असा माझा विश्वास आहे. याठिकाणी आमदार टी.कृष्णा रेड्डी उपस्थित होते. या लाडूचा लिलाव जिंकल्यानंतर मीही राजकारणात यशस्वी झालो होतो असे ते म्हणाले. सकाळी ९ वाजता सुरु झालेला लाडूचा हा लिलाव १०.३० वाजता म्हणजेच साधारण दिड तासानी लगेच संपला. त्यामुळे २५ वर्षांपासून लिलावासाठी ठेवल्या जाणाऱ्या या लाडूला विक्रमी किंमत आल्याचे चित्र आहे.