नेव्ही सीलकडून लादेनहत्येची हकिगत कथन
जगातील मोस्ट वाँटेड दहशतवादी ओसामा बिन लादेन याला ठार करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडलेल्या सील पथकातील एका नेव्हीसील जवानाने लादेनचा खात्मा करताना आलेल्या अनुभवांचे थरारक वर्णन केले असून, नेव्हीसील कमांडोजना सामोरे जाताना लादेनने त्याच्या बायकोला पुढे केले होते असे त्याने म्हटले होते.
नेव्ही सीलने नाव न सांगण्याच्या अटीवर एस्क्वायर नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की चोपन्न वर्षांचा लादेन आपल्याला वाटले होते त्यापेक्षा उंचापुरा होता. अबोटाबाद येथे मे २०११ मध्ये त्याच्या प्रासादात तिसऱ्या मजल्यावरील त्याच्या खोलीत जाऊन आम्ही ही कारवाई केली होती.
लादेनची ओळख पटवून त्याला ठार करण्यापर्यंतची प्रक्रिया अवघ्या पंधरा सेकंदात आटोपली असे सांगून तो म्हणाला, की लादेन त्या खोलीत उभा होता. त्याने त्याच्या बायकोच्या खांद्यावर हात ठेवले होते व त्याने तिला काहीसे पुढे लोटून धरले होते, ती त्याची सर्वात तरुण बायको ‘अमल’ होती.
नेव्हीसील्सना सगळे स्पष्ट दिसत होते, कारण त्यांच्याकडे नाइटस्कोप म्हणजे निशादृष्टी उपकरणे होती, पण अंधारामुळे लादेनला व त्याच्या घरातील कुणाला काहीच दिसत नव्हते. त्यांना आवाज ऐकू येत होते, पण दिसत नव्हते. आम्हाला बघताच लादेन गोंधळला, उंच्यापुऱ्या लादेनने डोक्यात टोपी घातली होती. तो उभा होता व थोडा हलतही होता. त्याने बायकोला समोर धरले होते. कदाचित त्याला संरक्षणासाठी तिचा वापर करायचा होता. जे लक्ष्य होते ते समोर दिसत होते, तो तोच होता व आम्ही जिथे प्रशिक्षण घेतो तिथे त्याचा मुखवटा लावलेले चेहरे असायचे व त्यावर आम्ही गोळी झाडायचो. आता त्याची पुनरावृत्ती करायची होती व क्षणार्धात गोळय़ांची फैर झडली अन् सगळे संपले. लादेनने कटिंग केलेली होती, त्याच्या डोक्यावर फारसे केस नव्हते, कारण तो क्रू कट होता एवढे चांगले आठवते.

Story img Loader