आपल्या दहशतवादी कारवायांनी संपूर्ण जगाला घाबरवून सोडणाऱ्या कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनलाही आपले काम करून घेण्यासाठी तलाठय़ाला चक्क लाच द्यावी लागल्याचे उघडकीस आले आहे. अमेरिकेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पाकिस्तानात लपून बसलेल्या लादेनने आपल्या घराभोवती संरक्षण भिंत उभारण्यासाठी स्थानिक महसूल अधिकाऱ्याला चक्क पन्नास हजारांची लाच देऊ केल्याची माहिती लादेनच्या दैनंदिनीतील नोंदीवरून उघडकीस आली आहे.
ट्विन टॉवरवरील दहशतवादी हल्ल्यानंतर लादेनला ठार मारण्यासाठी अमेरिकेने साऱ्या जगात शोधमोहीम सुरू केली होती. मात्र लादेन आपल्या कुटुंबासह पाकिस्तानातील अबोटाबाद शहरात लपून राहिला होता. आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी लादेनला अबोटाबाद येथे तीन मजली इमारत आणि सुरक्षित कुंपण बांधायचे होते. मात्र ते बांधकाम करण्यासाठी स्थानिक महसूल कार्यालयातील तलाठय़ाने लादेनकडे पन्नास हजारांची लाच मागितली होती. त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या लादेनने निमुटपणे महसूल कार्यालयातील तलाठय़ाला  पन्नास हजार रुपये दिले आणि बांधकाम केले. मात्र अमेरिकेच्या फौजांनी लादेनचा ठावठिकाणा शोधून काढत गेल्या वर्षी २ मे रोजी त्याला ठार केले. लादेनच्या मृत्यूनंतर पाकिस्तानी लष्कराने अबोटाबाद येथील त्याचे घर आणि १४ फूट संरक्षक भिंत उद्ध्वस्त केली आणि तेथून एक लाख ३७ हजार कागदपत्रे तसेच लादेनची दैनंदिनीही जप्त केली. लादेन आपली दैनंदिनी रोज लिहित असे. पाकिस्तानी लष्कराने लादेनच्या दैनंदिनीचे भाषांतर केल्यानंतर त्याने दिलेल्या लाचेचे प्रकरण उघडकीस आले. लादेनने आपल्या दैनंदिनीत कुंपण बांधणीसाठी दिलेल्या लाचेचे सविस्तर वर्णन केले आहे.
दरम्यान, अमेरिकी लष्कराने लादेनचा खातमा केल्यानंतर त्याची ओळख लपवून ठेवल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी लाचखोर पटवारीला अटक केली होती.     

Story img Loader