पीटीआय, संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेत काश्मीरचा मुद्दा मांडल्याबद्दल भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘‘अल- कईदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला आसरा देणाऱ्या आणि शेजारच्या राष्ट्रातील संसदेवर हल्ला करणारा देश सामथ्र्यशाली संयुक्त राष्ट्रांसमोर उपदेश देण्यास पात्र नाही,’’ अशा शब्दांत भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेत खुल्या चर्चेत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जोरदार टिप्पणी केली.
जयशंकर म्हणाले, संयुक्त राष्ट्रांची विश्वासार्हता सध्याच्या काळातील प्रमुख आव्हानांच्या प्रभावी प्रतिसादावर अवलंबून आह़े मग ते साथीचे आजार, हवामान बदल, किंवा दहशतवाद आदी मुद्दे असो. आम्ही विविध समस्यांवर सर्वोत्तम उपाय शोधत असताना पाकिस्तान अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित करत आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या या देशाने आम्हाला शिकवू नये, अशा प्रकारे उपदेश देण्याचा त्यांना अधिकार नाही, असे जयशंकर म्हणाले.