Lady Don Arrest: गेल्या दोन दिवसांपासून राजधानी दिल्लीत लेडी डॉन जिक्राची जोरदार चर्चा दिसून येत आहे. १७ एप्रिल रोजी दिल्लीच्या सीलमपूर भागात १७ वर्षांच्या कुणालवर जिकरानं धारदार शस्त्रानं अनेकदा वार केले. यात कुणाल गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता तिथे त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी जिकराला अटक केली असून सोमवारी तिला न्यायालयात नेत असताना तिनं आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

स्वत:ला लेडी डॉन म्हणवून घेणाऱ्या जिकरानं कुणालवर हल्ला केल्यानतर १७ एप्रिल रोजी दिल्लीत दोन धार्मिक गटांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील अनर्थ टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह जिकराची चौकशी सुरू केली आहे. इतर दोन मुलं फरार असून जिकराला पोलिसांनी अटक केली आहे. कुणालच्या हत्येचा कट तिनंच रचल्याचा पोलिसांना संशय आहे.

काय म्हणाली जिकरा खान?

जिकराला पोलिसांनी अटक केल्यापासून तिनं हत्येचे आरोप फेटाळून लावले आहेत. सोमवारी तिला सत्र न्यायालयात हजर करण्यासाठी नेलं जात असताना माध्यमांनी तिला हत्येच्या आरोपांबाबत प्रश्न केला. त्यावर आपण त्याला मारलं नसल्याचं जिकरा खान म्हणाली. “कुणालला का मारलं?” असा प्रश्न प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी जिकरा खानला केला. पण त्यावर “मी कुणालला मारलेलं नाही. मला या प्रकरणात फसवलं जात आहे”, असं जिकरा खान म्हणाली.

कोण आहे जिकरा खान?

मूळची दिल्लीची असणारी जिकरा खान हिला प्रसिद्धिची मोठी सवय आहे. ही प्रसिद्धीही तिला गँगस्टर म्हणून हवी आहे. सोशल मीडियावर ती प्रसिद्धीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे रील शेअर करत असते. ती तिच्या आई-वडिलांबरोबर दिल्लीत राहात असून तिला दोन वर्षांची एक मुलगीदेखील आहे. सलीमपूर भागात ती एक गुंडांची टोळीही चालवते. जिकरा खान हिच्यावर याआधीही गुन्हे नोंद आहेत. गेल्याच महिन्यात तिला बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती.

जिकरा खान ही सध्या तुरुंगात असणारा गँगस्टर हाशिम बाबाची पत्नी झोया खानच्या संपर्कात आली. बरेच महिने ती त्यांच्यासोबतच होती. हाशिम बाबाला अटक झाल्यापासून तिनं स्वत:ची गँग बनवली. “ती अचानक मध्यरात्री १-३ वाजता तिच्या गँगसोबत रस्त्यांवरून फिरत असे, जेणेकरून आपण गँगस्टर आहोत, हे सिद्ध होऊ शकेल. लोकांनी तिला एक गुन्हेगार म्हणून घाबरावं असं तिला वाटत होत”, अशी माहिती या परिसरात राहणारे ४८ वर्षीय रेहान खान यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिली.