हिमाचल प्रदेशात कसौली येथे बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या सरकारी महिला अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणातील आरोपी विजय ठाकूर याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. विशेष म्हणजे ती महिला अधिकारी लाच घेत नव्हती, म्हणून मी तिला ठार केले, अशी अजब कबुली त्याने पोलिसांपुढे दिली आहे.
कसौलीत बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई करण्यासाठी ५१ वर्षीय सहाय्यक नगर नियोजक शैला बाला गेल्या होत्या. त्यावेळी या महिला अधिकाऱ्याची पाठलाग करत गोळी घालून हत्या करण्यात आली होती आणि मारेकरी हॉटेल व्यवसायिक विजय ठाकूर फरार झाला होता. अखेर पोलिसांनी मथुरा येथून त्याला अटक केली.
अटक केल्यावर त्याने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्या महिला अधिकारी कारवाई करण्यासाठी आल्या होत्या. मी त्यांना लाच देण्यास तयार होतो. पण त्यांनी सरळ सर्वोच्च न्यायालयाची नोटीस दाखवत कारवाई करणार असल्याचे सांगितले. मी लाच देत असूनही त्यांनी लाच घेतली नाही, मग मी त्यांना ठार मारले, असा कबुलीजबाब विजय ठाकूरने दिला.
विजय, त्याची आई नारायणी देवी आणि शैला बाला यांच्यात नारायणी गेस्ट हाऊसमध्ये वाद झाले. प्रकरण दाबण्यासाठी त्याने शैला बाला यांना लाच देऊ केली. पण त्यांनी लाच घेण्यास नकार दिल्यामुळे त्यांना गोळ्या घालून विजय पळून गेला.