छत्तीसगढमध्ये विकासाचा अभाव असल्यामुळे काही लोक चुकीचा मार्ग निवडून नक्षलवादाकडे ओढले जात आहेत़  केंद्र शासनाचा पूर्ण पाठिंबा असूनही येथील रमण सिंग यांच्या नेतृत्वाखालील भाजप शासन नक्षलवादाच्या समस्येला समर्थपणे तोंड देत नाही, असे आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी येथे बोलताना केल़े  तसेच ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दलही त्यांनी या वेळी भाजप शासनाला लक्ष्य केल़े
त्या येथील निवडणूक प्रचार सभेत बोलत होत्या़  येथील भाजप शासनाने नक्षली कारवायांतील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय उपाय केले, असा प्रश्नही या वेळी उपस्थित केला़  विकासाचा अभाव असल्यामुळे राज्यात बेरोजगारी, लोकांमध्ये औदासीन्य वाढीस लागले आह़े  त्यामुळे लोक नक्षलवादाकडे वळत आहेत, असेही सोनिया म्हणाल्या़  विकासाच्या नावाखाली भाजप जनतेची फसवणूक करीत आह़े  भाजपच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात राज्य आणखी मागे गेले आह़े  केंद्र शासनाकडून हजारो कोटी रुपये आणि टनावारी धान्य देण्यात येत असताना राज्य शासनाच्या दुर्लक्ष्यामुळे ते राज्यातील गरीबांपर्यंत पोहोचतच नाही, अशीही टीका सोनिया यांनी केली़
छत्तीसगढमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा झाले आहेत़  महिला भयग्रस्त आहेत़  आदिवासींना त्यांच्या स्वत:च्या जमिनीच्या मालकीचा अधिकार देण्यात येत नाही़  छत्तीसगढमध्ये गरिबी आणि बेरोजगारी सातत्याने वाढत आहे, असेही आरोप करीत सोनिया यांनी अखेर माओवाद्यांकडून काँग्रेस नेत्यांच्या करण्यात आलेल्या हत्याकांडाची आठवण करून देत मतदारांना भावनिक सादही घातली़

Story img Loader