Lal Bahadur Shastri Death Mystery : लाल बहादूर शास्त्री, भारताचे दुसरे पंतप्रधान. जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर देशाची धुरा कोणाच्या हातात द्यावी, हा खूप मोठा प्रश्न सर्वांसमोर पडला होता, तेव्हा जे नाव समोर आले ते होते लाल बहादूर शास्त्री यांचे. नेहरूंच्या निधनानंतर देश सांभाळायची वेळ आली, तेव्हा ते मोठ्या हिमतीने उभे राहले. सुटाबूटामध्ये वावरणारे अनेक पंतप्रधान तुम्ही पाहिले असतील, पण धोती आणि कुर्तीमध्ये ‘जय जवान, जय किसान’चा नारा देणारे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व कधीही होणे नाही. धोती-कुर्ता घालणाऱ्या शास्त्रीजींच्या वागण्या बोलण्यात खूप साधेपणा जाणवायचा. नम्र, निष्ठावान आणि दृढनिश्चयी म्हणून ते विशेष लोकप्रिय होते. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा मोठा पगडा होता. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा पैलू होता.
लाल बहादूर शास्त्री यांचे जीवन नेहमीच संघर्षाने भरलेले होते. पंतप्रधानपदी असतानासुद्धा त्यांना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले. त्यातलाच एक होता ताश्कंद करार. लाल बहादूर शास्त्री यांच्या नावाबरोबर कायमचा जोडला गेलेला हा करार. जेव्हा लाल बहादूर शास्त्री यांचे नाव घेतले जाते तेव्हा ताश्कंद करारसुद्धा सर्वांना आठवतो. हो, तोच ताश्कंद करार, ज्यावर स्वाक्षरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली होती. त्यावेळी त्यांचा मृत्यू कसा झाला होता? त्यांना खरंच हार्ट अटॅक आला होता का? त्यांना जेवणात विष दिले होते का? असे अनेक प्रश्न त्यांच्या मृत्यूबाबत आजही विचारले जातात. त्यासाठी सुरुवातीला आपण ताश्कंद करार नेमका काय होता आणि त्या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांच्याबरोबर त्या रात्री काय घडले? या विषयी सविस्तर जाणून घेऊ या.
ताश्कंद करार
१९४७ साली भारत-पाकिस्तानची फाळणी झाली. त्यानंतर या दोन देशांमध्ये वारंवार सीमावाद चिघळत होता. सीमावादावरून १९६५ मध्ये परत पुन्हा युद्ध चिघळले. ऑगस्ट १९६५ मध्ये पाकिस्तानी लष्कराने ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ या नावाने मोहीम काढून जम्मू-काश्मीरच्या भारतीय प्रदेशात सैन्य घुसवले. प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारनेही पाकिस्तानी लष्करांवर हल्ला चढवला. सतरा दिवस चाललेले हे यु्द्ध अनिर्णीत अवस्थेत थांबले. ताश्कंद करारानुसार भारत आणि पाकिस्तानने या युद्धात परस्परांच्या घेतलेल्या प्रदेशांवरील हक्क सोडून १९४९ साली ठरलेल्या युद्धबंदी रेषेपर्यंत माघार घेतली. हा एक शांततेचा करार होता.
ताश्कंद करारावर स्वाक्षरी – १० जानेवारी
सीपी श्रीवास्तव हे ‘लाल बहादूर शास्त्री – राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम’ या त्यांच्या पुस्तकात लिहितात, “१० जानेवारी रोजी शास्त्री एकूण घडामोडींबद्दल तर विशेष आनंदात होते. अयुब खान यांच्या समवेतचा भोजनाचा कार्यक्रम झकास पार पडला होता आणि पाकिस्तानबरोबरच्या मैत्रीच्या नव्या पर्वाची चाहूल दिसू लागली होती. दुपारी ४ वाजता शास्त्रींनी ताश्कंद करारावर स्वाक्षरी केली. सायंकाळी कोसिजिन यांनी आयोजिलेल्या स्वागत सोहळ्याच्या वेळी ते आनंदानं प्रफुल्लित झालेले होते. उपस्थितांमध्ये मिळून मिसळून ते गप्पा मारीत होते, हस्तांदोलन करीत होते. पाक व सोव्हिएत शिष्टमंडळाच्या सदस्यांशी शुभेच्छांची देवाण-घेवाण करीत होते. त्यांनी अयूब यांचा निरोप घेताना केलेलं हस्तांदोलन तर उभयतांच्या जिव्हाळ्यानं ओतप्रोत भरलेलं होतं. आपल्या निवासस्थानाकडे निघताना शास्त्री कोसिजिनना भेटले व त्यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. सबंध दिवसभर मी शास्त्री यांच्याबरोबरच असल्यानं या गोष्टींना मी साक्षीदार आहे.”
आपली प्रकृती ही आपण व आपले डॉक्टर यांच्यातील सर्वस्वी खासगी बाब आहे – लाल बहादूर शास्त्री
सीपी श्रीवास्तव त्यांच्या या पुस्तकात सांगतात, “ताश्कंद येथे १०-११ जानेवारी रात्री पहाटे १ वाजून ३२ मिनिटांनी शास्त्री यांचं आकस्मिक निधन झालं. त्यांचं निधन ज्या परिस्थितीत झालं, त्याबद्दल देशातील अनेकांनी व परदेशस्थ भारतीयांनी माझ्याशी बोलताना शंका व्यक्त केल्या होत्या. ताश्कंद परिषदेच्या त्या सबंध आठवड्यात शास्त्री यांची प्रकृती चांगली ठणठणीत होती हे परिषदेला हजर राहिलेल्या सर्वांनी पाहिलं होतं. सतत चाललेली चर्चा, ताण-तणाव, वाटाघाटी फिसकटण्याचा निर्माण झालेला धोका या सर्व घडामोडींत शास्त्री यांच्यावर शारीरिक किंवा बौद्धिक चिंतेची पुसटशी छटाही दिसली नव्हती.”
श्रीवास्तव पुढे लिहितात, ” शास्त्री सहसा आपल्या तब्येतीबद्दल बोलायला उत्सुक नसत, हे इथं नमूद करायला हवं. आपली प्रकृती ही आपण व आपले डॉक्टर चुग यांच्यातील सर्वस्वी खासगी बाब आहे, असं त्यांचं मत होतं. थोडीशीही विश्रांती न घेता तासन् तास एवढं काम करू नका, अशी विनंती माझी पत्नी निर्मला हिनं एकदा त्यांना केली होती. त्यावर शास्त्रींची प्रतिक्रिया नम्र, पण ठाम होती. ते म्हणाले, “मला असंच काम करीत राहायला हवं. ते मला नाही बदलता येणार. मला जे काय व्हायचं असेल ते होईल!” त्यांची भूमिका ही अशी अढळ होती. ते काहीही असो, पण त्या दिवशी म्हणजे १० जानेवारी रोजी किंचितही काळजी वाटावी अशी शास्त्रींची तब्येत नव्हती.”
१० व ११ जानेवारीच्या मध्यरात्री नेमके काय घडले?
श्रीवास्तव सांगतात, ” त्या दिवशी रात्री १०.३० वाजता शास्त्रींचा निरोप घेऊन भारतीय शिष्टमंडळानं देशी व विदेशी पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला मी गेलो. तेथून हॉटेलवर मी परतलो, तेव्हा जगन्नाथ सहाय यांनी फोन करून पंतप्रधान अचानक आजारी झाल्याचं मला कळवलं. पण, मी त्यांच्या जवळ पोहोचलो त्यापूर्वीच त्यांचं निधन झालेलं होतं. पहाटे १ वाजून ३२ मिनिटांनी शास्त्रींचं प्राणोत्क्रमण झालं. या मधल्या काळात नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी जगन्नाथ सहाय व एम. एम. एन. शर्मा यांच्याशी मी तपशीलवार बोललो. हे दोघे शास्त्रींच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांपैकी होते व शास्त्रींच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्याबरोबर होते. ते शास्त्रींचे अत्यंत एकनिष्ठ सेवक होते.”
हेही वाचा : अयोध्या राम मंदिर: प्राणप्रतिष्ठा काय असते? काय सोहळा असतो आणि काय विधी असतात?…
जगन्नाथ सहाय व एम. एम. एन. शर्मा यांनी सीपी श्रीवास्तव यांना सांगितल्याप्रमाणे –
“सोव्हिएत रशियाच्या स्वागत समारंभाहून परतल्यावर जगन्नाथ सहाय व एम. एम. एन. शर्मा हे दोघे सामानाची बांधाबांध करण्यात गढून गेले. कारण दुसऱ्या दिवशी काबूलला जायचं होतं. दोघेही पंतप्रधानांच्या आधीच परतले होते. डॉ. चुग व पंतप्रधान यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांची उतरण्याची सोय शास्त्रींच्या निवासस्थानाच्या तळमजल्यावर केलेली होती. पंतप्रधानांचा वैयक्तिक अटेंडंट रामनाथ यानं जेवण वाढू काय, असं शास्त्रींना विचारलं. त्या वेळी जगन्नाथ सहायही शास्त्रींच्या समवेत होते. खरं तर मला फारशी भूक नाही, असं शास्त्री म्हणाले. पण, क्षणभर थांबून त्यांनी पावाचा एक स्लाइस, थोडी भाजी व फळं आणायला रामनाथला सांगितलं. आचारी महमद जान व रशियन आचारी यांनी बनवलेलं हलकं भोजन घेऊन रामनाथ परतला. महमद जान हा भारताचे मॉस्कोतील राजदूत टी. एन. कौल यांचा आचारी. पंतप्रधान व त्यांचे पाहुणे यांच्यासाठी भारतीय पदार्थ बनविण्यासाठी त्याला सरकारच्या परवानगीनं कौल ताश्कंदला घेऊन आले होते. रामनाथनं आणून दिलेलं भोजन शास्त्रींनी घेतलं.
त्याच सुमाराला पंतप्रधानांच्या खासगी सचिवांपैकी व्ही. एस. व्यकंटरमण यांचा दिल्लीहून फोन आला. तो जगन्नाथ सहाय यांनी घेतला. पंतप्रधान दिल्लीला पोहोचतील तेव्हा विमानतळावर स्वागताची काही विशेष व्यवस्था त्यांना हवी आहे काय, असं त्यांनी विचारलं. सहाय यांनी शास्त्रींना हे सांगितलं. तेव्हा ते उत्तरले, “वे जो ठीक समझें वो करें.” सहाय यांनी व्यंकटरमणना हा निरोप दिला. त्यानंतर ताश्कंद कराराबद्दल सर्वसाधारण प्रतिक्रिया काय उमटली आहे हे व्यंकटरमणना विचारा असं शास्त्रींनी सांगितलं. त्यावर अटल बिहारी वाजपेयी (जनसंघ) आणि एस. एन. द्विवेदी (प्र. स. प.) यांनी केलेली काहीशी टीका वगळता सर्वसाधारण स्वागत झालं आहे, अशी माहिती व्यंकटरमण यांनी सहायना दिली. त्यांनी ती शास्त्रींना सांगितली तेव्हा शास्त्री नेहमीच्या मृदू भाषेत म्हणाले, “ते विरोधी पक्षात आहेत व टीका करणं हा त्यांचा हक्कच आहे.”
त्यानंतर थोड्या वेळानं सहाय यांनी दिल्लीला शास्त्री यांच्या घरी फोन जोडून दिला. शास्त्रींना पत्नीशी बोलायचं होतं, परंतु ललितादेवींना फोनवरचं बोलणं नीट ऐकू येत नव्हतं. तेव्हा शास्त्री कुटुंबातील अन्य सदस्यांशी बोलले. त्यांच्याकडूनही ताश्कंद करारावर भारतात उमटलेल्या प्रतिक्रियांची माहिती शास्त्रींना समजली. दुसऱ्या दिवशीची सकाळची दिल्लीची वृत्तपत्रं काबूलला येणाऱ्या भारतीय विमानांतून पाठवा, असं शास्त्रींनी त्यांचे तरुण जावई व्ही. एन. सिंग यांना सांगितलं. टेलिफोन करून झाल्यावर जगन्नाथ सहाय यांनी काबूलहून दिल्लीला जाताना पाकिस्तानवरून विमानाचं उड्डाण टाळलेलं बरं, असं शास्त्रींना सुचवलं. थोड्याच दिवसांपूर्वी भारताचे नागरी विमान पाकिस्ताननं पाडलं होतं व त्यात गुजरातचे मुख्यमंत्री बलवंतराय मेहता यांचे प्राण गमावले होते, या घटनेचं त्यांनी शास्त्रींना स्मरण करून दिलं. पुन्हा असंच त्यांनी काही केलं तर…? अशी शंका सहाय यांनी काढली. त्यावर शास्त्री उत्तरले, “मला नाही असं वाटत, अध्यक्ष अयूब भले गृहस्थ आहेत आणि आता तर आपण शांततेचा करार केला आहे.”
भारताच्या माहिती व प्रसारण खात्याच्या वृत्तचित्र विभागाचे प्रेम वैद्य व नारायणस्वामी हे दोन छायाचित्रकार ताश्कंदला आलेले होते. पंतप्रधानांच्या शय्यागृहाबाहेरून छायाचित्रं घेण्यास त्यांनी परवानगी मागितली होती
शास्त्रींनी परवानगी दिली. प्रेम वैद्य व नारायणस्वामी यांनी छायाचित्रं काढली. शास्त्रींचं ते अखेरचं छायाचित्र ठरलं. तोवर ११.३० वाजून गेले होते. जगन्नाथ सहाय तोवर पंतप्रधानांच्या समवेत होते व शास्त्रींना काही त्रास होतोय असं तेव्हा जाणवलंही नव्हतं. थोड्याच वेळात सहाय शास्त्रींच्या खोलीतून बाहेर पडले. त्यानंतर पंतप्रधानांसाठी रामनाथनं दूध आणून दिलं. मध्यरात्रीच्या साडेबारापर्यंत रामनाथ शास्त्रींच्या शय्यागृहातच होता. शास्त्री पलंगावर पहुडले होते. त्यांनी रामनाथला “आता तू जाऊन झोप” असं सांगितलं, तेव्हाही पंतप्रधानांना काही अस्वस्थ वाटत नव्हतं हे उघड आहे.
जगन्नाथ सहाय कर्मचाऱ्यांच्या शय्यागृहात ११.३० ला परतले होते. डॉ. चुग झोपायला गेले व थोड्याच वेळात त्यांना गाढ झोप लागली. जगन्नाथ सहाय, शर्मा व कपूर हेही झोपायला निघतच होते. इतक्यात पहाटे १ वाजून २० मिनिटांच्या सुमारास पंतप्रधान त्यांच्या शय्यागृहाच्या दाराशी उभे असलेले त्यांना दिसले. त्यांच्या अंगात झोपायला जाताना ते घालीत तसे कपडे होते. त्यांनी टोपी घातली नव्हती, मात्र पायांत चपला होत्या. त्यांच्या हालचालीत घाई नव्हती. काही क्षण ते दरवाजाशीच थबकले, आत प्रवेश न करताच त्यांनी खोलीभर दृष्टिक्षेप टाकला. तिथे या तिघांना पाहून त्यांनी विचारलं, “डॉक्टर कुठायत?” त्यावर सहाय उत्तरले, “बाबूजी, ते इथंच झोपले आहेत.” शास्त्रींना डॉक्टरांची गरज आहे हे ऐकल्याबरोबर सहाय लगेच त्यांना म्हणाले, “तुम्ही शय्यागृहात चला. मी डॉक्टरना घेऊन ताबडतोब येतोच.”
शास्त्रींना त्यांच्या शयनगृहाकडे घेऊन जायला शर्मा व कपूर निघाले. ते दोघे पंतप्रधानांना हाताला धरून नेणार होते, पण पंतप्रधान त्यांची मदत न घेताच चालत निघाले. अर्ध्या वाटेवर त्यांना खोकला आला व त्यानंतर ते सारखे खोकतच राहिले. त्यांच्या शयनगृहात शिरल्यावर पंतप्रधानांना पडून राहायची विनंती शर्मा व कपूर यांनी केली. ते बिछान्यावर आडवे झाले. त्यांना बोलायला त्रास होत होता, पण त्यांनी ‘फ्लास्क’कडे अंगुलिनिर्देश केला. शर्मानं त्या फ्लास्कमधील पाणी शास्त्रींना दिलं. तोवर शास्त्री पूर्ण शुद्धीवर होते असं शर्मांनी नंतर सांगितलं. “तुम्ही पाणी प्यायलात, तेव्हा आता बरं वाटेल”, असं शर्मा त्यांना म्हणाले.
डॉ. चुग व सहाय धावतच आले. डॉक्टरांनी औषधांची बॅग बरोबर आणलीच होती. त्यांनी शास्त्रींची नाडी तपासली व त्यांना एक इंजेक्शन दिलं. त्या वेळी अत्यंत उद्वेगानं डॉ. चुग पुटपुटले, “बाबूजी, आपने मुझे मौका नहीं दिया.” तोवर पंतप्रधानांच्या काळजात धुगधुगी होती, परंतु त्यांना खूप वेदना होत होत्या. ते सारखे खोकत होते व त्यांना श्वास घेणं जड जात होतं. सतत खोकल्याची उबळ चेत असताना शास्त्री अधूनमधून ‘अरे बाप, अरे राम’ असं पुटपुटत होते. डॉ. चुग त्यांची छाती चोळीत होते. त्यांनी त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आलं नाही. पहाटे १ वाजून ३२ मिनिटांनी पंतप्रधानांची प्राणज्योत मालवली.”
हेही वाचा : भाजपचे राम मंदिरातील योगदान काय?…
शास्त्रींना आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती काय?
१० जानेवारी रोजी शास्त्रींनी प्रख्यात उर्दू कवी साकिब लखनवी यांच्या काही ओळी एका कागदावर लिहून ठेवल्या होत्या. हा कागद जगन्नाथ सहाय यांना सापडला व त्यांनी तो बराच काळ आपल्याजवळ जपून ठेवला होता. त्या ओळी अशा : ज़माना बड़े शौकसे सुन रहा था हमी सो गये दास्ताँ कहते कहते (सारं जग अत्यंत उत्कंठेनं ऐकत होतं- मीच झोपी गेलो कहाणी सांगता सांगता…)
शास्त्री यांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह का उपस्थित केले जातात?
श्रीवास्तव पुस्तकात लिहितात, “भारतातील अनेक जणांना शास्त्रींना नैसर्गिक मृत्यू आला असं वाटत नाही. शास्त्रींना काही तरी देण्यात आल्यामुळं त्यांना हृदयविकाराचा झटका आला अशी शंका ते व्यक्त करतात. शास्त्रींचा चेहरा व त्यांच्या शरीराचा काही भाग निळसर झाला होता, त्यामुळं ही शंका व्यक्त केली जात होती. निळसर डागांची चर्चा झाल्यानं सोविएत डॉक्टरांनी संशय दूर व्हावा म्हणून ४ नोव्हेंबर १९७० रोजी एक निवेदन प्रसृत केलं. त्यात ते म्हणतात, “पंतप्रधानांचं पार्थिव दिल्लीला पाठवण्यात येणार होतं. ताश्कंदप्रमाणेच तिथंही हवामानामुळं पार्थिव देहाचे लवकर विघटन होण्याची शक्यता असल्यानं डॉ. आर. एल. चुग यांच्या उपस्थितीत शव टिकवून ठेवण्याची प्रक्रिया (Embalming) त्यावर करण्यात आली. ‘एम्बामिंग’च्या द्रवात तीन लिटर शुद्ध स्पिरिट, एक लिटर फॉर्मालिन व २०० ग्रॅम युरोट्रोपाइन होतं. जांघेतील प्रमुख रोहिणीतून हा द्राव त्यांच्या शरीरात भरण्यात आला. पंतप्रधानांचा चेहरा निळसर पडल्याचा उल्लेख भारतीय वृत्तपत्रांनी केला आहे. ही प्रक्रिया केल्यानं असं घडणं नैसर्गिकच आहे.”
शास्त्रींवर विषाचा वापर झाला असण्याची कितपत शक्यता आहे?
श्रीवास्तव यांना या बाबतीत आणखी एखाद्या तज्ज्ञाचं मत अजमावावं असं वाटलं. त्यांनी डॉ. डेव्हिड स्पिरो व डॉ. वेस्ट यांना शास्त्रींच्या मृत्यूसंबंधीचे १९६६ व १९७० मधील वैद्यकीय अहवाल त्या दोघांनाही दाखवले. तसंच मृत्यूच्या आधीच्या बारा मिनिटांतील घटनाक्रमाचा तपशीलही त्यांना सांगितला.
डॉ. आयन वेस्ट यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतलं व मी सादर केलेली कागदपत्रं अभ्यासली. त्यानंतर त्यांनी पुढील उत्तरं दिली.
“नैसर्गिक कारणांनी मृत्यू होणाऱ्यांच्या बाबतीत असा निळसर रंग सुसंगत असतो. तो दोन कारणांमुळे असू शकतो : (१) सायानोसिस (रक्तातून प्राणवायू काढून घेतल्यानं त्वचेचा होणारा गडद निळा रंग) आणि (२) ‘एम्बामिंग’ची प्रक्रिया. ‘एम्बामिंग’मधील द्रावामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण (म्हणजेच प्राणवायू काढून घेणं) घटू शकतं. कदाचित या प्रकरणात हे महत्त्वाचं कारण असू शकेल.”
“शवविच्छेदन व विषचिकित्सा यांच्या अहवालाशिवाय विष दिलं नव्हतंच असं ठामपणं म्हणता येत नाही. परंतु, मला जो पुरावा उपलब्ध करून दिला आहे तो पाहता, असं घडणं अगदी अशक्य दिसतं. शास्त्रींच्या आजाराची लक्षणं व साक्षीदारांनी वर्णिलेली त्यांची त्या वेळची हालचाल पाहता त्यांना विषबाधा झाली असेल असं वाटत नाही. ती लक्षणंही तीव्र ‘मायोकार्डिअल इन्फार्शन’ अथवा हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याचं सूचित करणारी आहेत.” त्यानंतर डॉ. वेस्ट म्हणाले,
“विषबाधेची शक्यता १०० टक्के फेटाळून लावता येत नसली तरी शास्त्रींच्या पोटात विष गेल्याचा काही पुरावा नाही. याचाच अर्थ उपलब्ध असलेली सर्व माहिती त्यांचा मृत्यू ‘नैसर्गिक कारणांमुळं झाला’ या तथ्याशी सुसंगत आहे. त्यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता असं म्हणणं उपलब्ध पुराव्याशी सुसंगत नाही”, असेही ते पुढे म्हणाले.
शास्त्रींच्या मृत्यूच्या वेळी परिस्थितीसंबंधी आणखी काही माहिती श्रीवास्तव यांनी या पुस्तकात नमूद केली आहे –
“पंतप्रधानांच्या निधनापूर्वीच्या त्या १२ मिनिटांत किंवा त्याआधीच्या काही तासांत शास्त्रींना मळमळत आहे, उलटीची भावना होत आहे किंवा त्यांना भोवळ आल्यासारखं वाटत आहे अशी कोणतीही लक्षणं तिथे हजर असलेल्यांना आढळली नव्हती.
शास्त्री यांच्या पलंगानजीक ‘कॉलबेल’ बसवलेली नव्हती. शास्त्रींना पूर्वी हृदयविकाराचे झटके येऊन गेले होते, हे लक्षात घेता अशी कॉलबेल नसणं ही गंभीर उणीव होती. मात्र, एक बझरची सोय असलेला टेलिफोन त्यांच्या सदनिकेत बसवलेला होता. तो फोन उचलताच डॉक्टरांचे शय्यागृह व वैयक्तिक कर्मचारी शय्यागृह यातून बझर मोठ्यानं घणघणू लागेल अशी ही व्यवस्था होती. आपल्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांना बोलावून घेण्यासाठी शास्त्री या फोनचा वापर करीत.
पंतप्रधानांच्या शय्यागृहाशेजारील बैठकीच्या दालनात हा बझरयुक्त फोन ठेवलेला होता. त्या दिवशी सायंकाळी शास्त्रींनी आपला बहुतेक वेळ बैठकीच्या दालनातच घालवला. पंतप्रधानांच्या पलंगापासून काही पावलांवरच बैठकीची खोली असली तरी त्या फोनचं एक ‘एक्स्टेन्शन’ पलंगाजवळ बसवलेलं नव्हते, त्यामुळं जेव्हा पहाटे १ वाजून २० मिनिटांच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागलं तेव्हा त्यांना पलंगावरून उठणं भाग पडलं.
ताश्कंद करारावर भारतातील दोघा विरोधी पक्षनेत्यांनी केलेली टीका पंतप्रधानांना फोनवरून समजली होती. त्यामुळं ते अस्वस्थ झाले होते व त्याचमुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा, असं मत काहींनी व्यक्त केलं आहे. हृदयविकाराचा त्रास असलेल्या एखाद्या व्यक्तीला कधीकधी विरोधी वा निराशाजनक वृत्त आकस्मिकपणं कळलं तर त्यामुळं त्याला आणखी एखादा हृदयविकाराचा झटका येण्याचा संभव असतो, असं डॉ. वेस्ट यांनी सांगितलं.
ताश्कंद करारावर शास्त्रींना त्यांच्या मनाविरुद्ध स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आलं असावं अशीही शंका काहींनी व्यक्त केली होती. हे निखालस खोटं आहे. शास्त्रींनी या करारावर स्वखुशीनं स्वाक्षरी केली होती व मोठी कामगिरी पार पडली, असं त्यांना वाटत होतं. सोविएत नेत्यांनी कोठलंही दडपण आणण्याचे प्रयत्न केलेले नव्हते. तसंच शास्त्री कोणाच्या दडपणाला बळी पडणारे नव्हते.
सतत संशय व्यक्त केला जाऊ लागल्यानं ताश्कंद इथे शास्त्रींना ठार करण्यात कोणाला स्वारस्य असेल असा विचार श्रीवास्त यांनी केला. असं क्रूर कृत्य एखाद्या रशियन यंत्रणेनं वा व्यक्तीनं केलं असण्याची सुतराम शक्यता नाही, असं त्यांचं मत आहे. पंतप्रधानांवर रशियन अत्यंत आनंदी होते. कोसिजिन, ग्रोमिको व त्यांच्या शिष्टमंडळाचे अन्य सदस्य यांना शास्त्रींबद्दल किती आदर वाटत होता हे त्यांनी स्वतः पाहिलं होतं शास्त्री यांच्या निधनामुळे आपला एक प्रामाणिक व विश्वासू स्नेही हरपला, अशीच रशियनांची भावना होती. त्यामुळे त्यांना खरं तर अतीव दुःख झालं होतं.
शवचिकित्सा केली गेली नाही म्हणून त्यावेळी शंकाकुशंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. त्या वेळचे केंद्रीय गृहसचिव व ताश्कंद येथील भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य एल. पी. सिंग यांना त्या वेळी शवचिकित्सेबद्दल विचार झाला होता काय असं श्रीवास्तव यांनी विचारलं.. सिंग हे शास्त्रींच्या विश्वासातील निकटचे सहकारी होते. ते म्हणाले, राजदूत टी. एन. कौल यांनी हा विषय माझ्यापाशी काढला होता. परंतु, सोव्हिएत डॉक्टर्स व खुद्द पंतप्रधानांचे डॉक्टर चुग यांनी मृत्यूचं निश्चित कारण स्पष्टपणं नमूद केलं होतं. शिवाय शास्त्रींना आधी दोनदा हृदयविकाराचे झटके येऊन गेले होते. या गोष्टी लक्षात घेता आणि शवचिकित्सेची आवश्यकता वाटावी अशी इतर काही कारणं नसताना या बाबतीत काही करण्याची गरज नाही, असा त्या दोघांनी निष्कर्ष काढला.
यशवंतराव चव्हाण व सरदार स्वर्णसिंग हे त्यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानी हजर होते व शास्त्रींच्या निधनानंतर सर्व सूत्रं त्यांच्याकडे होती. त्यांनीही वरील कारणांसाठीच शवचिकित्सेची मागणी केली नाही.
भारतात पंतप्रधानांचं पार्थिव आणल्यावरही शवचिकित्सा करणं शक्य होतं, असाही एक मुद्दा मांडला जातो. हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा हे शास्त्रींचा देह अंत्य दर्शनासाठी ठेवला होता त्या १०, जनपथ या निवासस्थानी बराच वेळ हजर होते. ताश्कंद इथे कोणत्या परिस्थितीत शास्त्रींना मृत्यू आला, याचा सर्व तपशील नंदांना सांगण्यात आला होता. त्यांनीही शवचिकित्सा करण्याचा आदेश दिला नाही. पंतप्रधानांच्या देहावर निळे डाग आहेत हे सर्वांनी पाहिलं असलं तरी कोणीही शवचिकित्सेची सूचना केली नाही. पंतप्रधानांच्या कुटुंबीयांनीही तशी मागणी केली नाही.”
लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू होऊन आज ५८ वर्षे झाली, तरी त्यांच्या मृत्यूबाबत गूढ कायम आहे. पार्थिव देहाची शवचिकित्सा का केली नाही? असा प्रश्न आजही विचारला जातो.