भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी रात्री नऊ वाजता दिल्लीतल्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वाढत्या वयोमानामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. रुग्णालयात ते सध्या डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. रात्री ११ च्या दरम्यान रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र त्यांना गुरुवारीदेखील रुग्णालयात थांबून उपचार घ्यावे लागणार आहेत. अडवाणी यांची प्रकृती खालावल्यामुळे गेल्या आठवड्यातही (२७ जून) त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) त्यांच्यावर उपचार करण्यात आले. चार दिवस उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. त्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं. अडवाणी हे सध्या ९६ वर्षांचे आहेत. वाढत्या वयामुळे त्यांना तब्येतीच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकारने चार महिन्यापूर्वी भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं. प्रकृतीच्या कारणास्तव ते राजभवनावर आयोजित कार्यक्रमाला जाऊ शकले नव्हते. त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या घरी जाऊन हा पुरस्कार प्रदान केला होता. यावेळी त्यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि लालकृष्ण अडवाणी यांचे कुटुंबिय उपस्थित होते. याआधी २०१५ मध्ये त्यांना देशातील दुसरा सर्वात मोठा नगरी सन्मान पद्म विभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
हे ही वाचा >> चंपई सोरेन यांचा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन तिसऱ्यांदा राज्याची सूत्रं हाती घेणार
लालकृष्ण अडवाणी यांनी जून २००२ ते मे २००४ या काळात भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम पाहिलं होतं. तसेच ऑक्टोबर १९९९ ते मे २००४ या काळात ते केंद्रीय गृहमंत्री होते. भाजपा संघटनेसाठीही त्यांनी वेळोवेळी योगदान दिले होते. १९८६ ते १९९०, १९९३ ते १९९८, २००४ ते २००५ असे तीन वेळा त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत.