(प्रभू रामचंद्र मंदिराचं भूमिपूजन असल्याच्या पार्श्वभूमीवर हा १७ नोव्हेंबर २०१९ चा लेख पुनर्प्रकाशित करतो आहोत)

सुधींद्र कुलकर्णी

Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
Mallikarjun kharge
Acharya Pramod Krishnam : “खरे हिंदू…”, मल्लिकार्जुन खरगेंवर काँग्रेसच्या माजी नेत्याचीच टीका!
amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
Sharda Sinha, Chhath Puja songs, Bihar,
शारदा सिन्हा… छठ पूजा गीतांना अजरामर करणारी ‘बिहार कोकिळा’

अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या प्रदीर्घ काळ चिघळलेल्या मुद्दय़ावर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकालाद्वारे सामंजस्यपूर्ण तोडगा काढला आहे. मात्र, हा विषय केन्द्रस्थानी आणणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे आज उपेक्षेच्या खाईत लोटले गेले आहेत. राम मंदिर आंदोलनाचा मागोवा घेणारा लेख..

‘अयोध्या आंदोलन हा माझ्या राजकीय वाटचालीतील अत्यंत निर्णायक क्षण आहे. १९९० मध्ये सोमनाथ ते अयोध्या अशी जी राम रथयात्रा काढली त्याद्वारे या वाटचालीत परिस्थितीनेच मला विशिष्ट असे कर्तव्य बजावण्यास भाग पाडले. मी एका ध्येयाने, निष्ठेने, पूर्ण क्षमतेने कर्तव्य बजावले. यातून एक नवा भारत मला शोधता आला, तसेच माझ्यातील वेगळेपणाही दिसला. त्यामुळे अयोध्या चळवळ ही माझ्यासाठी एक लक्षणीय कृती होती; त्याद्वारे मनातून एक प्रतिबिंब उमटले.’’

– लालकृष्ण अडवाणी (‘माय कंट्री, माय लाइफ’- २००८) यांच्या आत्मचरित्रातून..

भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी विराजमान होण्यासाठी भारतीय जनता पक्षाची वाटचाल केव्हा, का आणि कशी सुरू झाली, या तीनही प्रश्नांची उत्तरे इतिहास नोंदवेल. हे परिवर्तन घडवून आणणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांचे नाव या उत्तरांमध्ये असेल. आजचा भाजप जो काही आहे, त्यामागे १९८० च्या दशकात अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी जी जनचळवळ उभी राहिली आणि अडवाणीजींनी तिला जे कणखर नेतृत्व दिले, त्याचमुळे हे चित्र दिसते आहे.

राम मंदिर उभारणीच्या बाजूने ९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याने रामजन्मभूमी- बाबरी मशीद खटल्यातील कायदेशीर लढाईचा शेवट झाला. त्या दिवशी माध्यमांत पंतप्रधानांचा आवाज आणि चेहऱ्याचा प्रभाव होता. खरे तर तो दिवस अयोध्या चळवळीचे महानायक अडवाणी यांचा होता. निकालाच्या आदल्याच दिवशी अडवाणी यांनी ९२ व्या वर्षांत पदार्पण केले. निकालानंतर त्यांनी माध्यमांकरता एक छोटेखानी पत्रक काढले, त्यात त्यांच्या भूमिकेचा विजय झाल्याचे नमूद केले आहे. माझ्यासाठी ही समाधानाची बाब आहे की परमेश्वराने या चळवळीत योगदान देण्याची संधी मला दिली. स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात मोठी जनचळवळ होती असे त्यात अडवाणींनी नमूद केले आहे.

१९८५ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून अडवाणी यांनी भाजप अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. भाजपचे दुसरे पक्षाध्यक्ष या नात्याने त्यांनी १९८९ मध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्दय़ावर जी जिगरबाज मोहीम राबविली, त्यामुळे भारतीय राजकारणाला निर्णायक वळण मिळाले. हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे भाजप अधिवेशनात केलेल्या ठरावाद्वारे भारतीय जनता पक्ष राम मंदिर उभारणीच्या या आंदोलनात सक्रीयपणे उतरला. फार क्वचितच वेळा पक्षाने संमत केलेल्या ठरावामुळे इतिहास घडताना दिसतो. तथापि हा प्रस्ताव आगळावेगळा होता. या प्रस्तावाच्या कर्त्यांने इतिहास घडविण्याचा जणू निश्चयच केला होता.

ज्या पद्धतीने या ठरावाची अडवाणी यांनी प्रत्यक्षात अंमलबजावणी केली ती अनोखी होती अन् वादग्रस्तही! ती नावीन्यपूर्ण अशासाठी होती, की रामरथाद्वारे गुजरातमधील सोमनाथ ते अयोध्या असा प्रवास करत, मंदिर उभारणीचा आपला मुद्दा त्यांनी शहरे, गावे आणि अगदी खेडय़ापाडय़ांपर्यंत नेला. या मोहिमेत भाजपचे त्यावेळचे रणनीतीकार प्रमोद महाजन यांनी रामरथाची कल्पना सुचवली. रथयात्रेच्या शेवटच्या टप्प्यात बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी रथयात्रा रोखली. परंतु तरीही या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट साध्य झाले होते. अयोध्येत बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिर उभारणीसाठी हिंदू समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा मिळवण्यात त्यातून यश मिळाले होते.

मात्र, त्यानंतर देशाच्या अनेक भागांत धार्मिक हिंसाचार उफाळल्याने ही रथयात्रा वादग्रस्त ठरली. अडवाणींच्या पुढील राजकीय कारकीर्दीसाठी ते काही प्रमाणात मारक ठरले. अयोध्येत प्रचंड संख्येने जमलेल्या जमावास आवरण्यात अपयश आल्याने त्याची परिणीती ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात झाली. त्यावेळी उद्वेगाने अडवाणी यांनी आपल्या आयुष्यातील हा अत्यंत दु:खद दिवस असल्याचे म्हटले होते. ‘या घटनेने मी निराश झालो आहे. अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडली गेल्याबद्दलची अतीव वेदना यासाठी होते आहे, की त्यामुळे जनतेच्या मनातील आमच्या विश्वासार्हतेला धक्का बसला. बाबरी मशीद सन्मानपूर्वक इतरत्र स्थलांतरित करून मगच रामजन्मभूमीच्या ठिकाणी आम्ही मंदिर उभारणी करणार आहोत, असे भाजपने जाहीर केले होते. सनदशीर मार्गाने किंवा हिंदू-मुस्लीम समाजाने एकत्रितपणे सामंजस्याने तोडगा काढून ही गोष्ट साध्य करण्याचे आमचे उद्दिष्ट होते. मात्र, आम्ही शब्दाला जागलो नाही, हेच या दुर्दैवी घटनेतून दिसून येते. राम मंदिर आंदोलनातील नेत्यांचे आदेश जमलेल्या काही कारसेवकांनी धुडकावले. त्यामुळे कायदा हातात घेणाऱ्या काही मंडळींमुळे राम मंदिर उभारणीच्या चळवळीसंबंधात विश्वासार्हतेला तडा गेला. नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात बाबरी मशीद पाडणे ही ‘कायद्याचे राज्य भंग करणारी कृती’ असल्याचा निर्वाळा दिला आहे. अर्थात त्यात अडवाणींच्या सहभागाचा काहीच पुरावा आढळलेला नाही. तथापि त्यावेळी काही कारसेवकांनी जी चूक केली त्याचे परिणाम मात्र अडवाणींना भोगावे लागले.

अडलबिहारी वाजपेयी सहमत नसतानादेखील अयोध्या आंदोलनात अडवाणी व भाजपने सामील होण्याचा निर्णय का घेतला? या प्रश्नाचे उत्तर कोणताही पूर्वग्रह न ठेवता घडलेल्या घटनाक्रमाचा अभ्यास केला तर नक्की मिळेल. मवाळ वाजपेयींच्या तुलनेत भाजपमध्ये ‘कडवे हिंदुत्ववादी’ अशी अडवाणींची प्रतिमा होती. मात्र, अलीकडच्या काळात- विशेषत: २००५ मध्ये पाकिस्तानला त्यांनी दिलेल्या भेटीनंतर त्यांची ही प्रतिमा बदलली. अर्थात तद्नंतर त्यांची प्रतिमा बदलली असली तरी नेमके खरे अडवाणी कोणते मानायचे, असा लोकांना पडलेला प्रश्न आहे. अर्थात अनेक गोष्टींमुळे अडवाणींमध्ये हे परिवर्तन झालेले दिसते. अयोध्या आंदोलनापूर्वी जननेते म्हणून त्यांची ओळख नव्हती. तथापि अयोध्या आंदोलनापस्चात ते भाजपाचे कर्तेधर्ते झाले. तत्कालीन जनसंघ १९८४ मध्ये जनता पक्षातून बाहेर पडल्यानंतर भाजपची स्थापना झाली. पक्षस्थापनेनंतर १९८४ च्या निवडणुकीत भाजपला मोठाच धक्का बसला. पक्षाला लोकसभेत केवळ दोनच जागा जिंकता आल्या. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या या निवडणुकीत वाजपेयींनाही पराभवाचा धक्का बसला. या कारणामुळेच पक्षाची सूत्रे त्यांनी अडवाणींकडे सोपविली. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावण्याची जबाबदारी अडवाणींवर येऊन पडली. अर्थात केवळ या कारणाने ते राम मंदिर आंदोलनाकडे वळले असे नाही. तर त्यांनी आत्मचरित्रात नमूद केल्याप्रमाणे, शाहबानो प्रकरणी राजीव गांधी यांची जो निर्णय फिरवला तो प्रामुख्याने यास कारणीभूत ठरला.

यासंदर्भात अडवाणी यांनी लिहिले आहे.. ‘मी स्पष्टपणे नमूद करतो की, जर काँग्रेस पक्षाने रामजन्मभूमीस पाठिंबा दिला असता तर भाजप या आंदोलनात उतरली नसती. राम मंदिर उभारणीत योगदानाचे श्रेय कोणाला मिळते, हा आमच्यासमोरचा प्रश्न नव्हता. पुढे पंतप्रधान झाल्यावर वाजपेयींनी ‘राष्ट्रीय भावना’ म्हणून या मुद्दय़ाचा जो उल्लेख केला, त्याची पूर्तता काँग्रेसने केली असती तरी आम्हाला समाधान वाटले असते. मात्र, महत्त्वाच्या क्षणी राजीव गांधी व काँग्रेस पक्ष मागे हटले, हे आमच्यासाठी निराशाजनक होते.

‘हिंदू समाजाची ही जी न्याय्य मागणी होती, त्याबाबतीत काही मुस्लीम संघटनांच्या नकारात्मक भूमिकेमुळे आम्ही सावध झालो. त्यावेळी भारतीय मुस्लिमांवर परिणाम करणारा हा जीवनमरणाचा प्रश्न आहे असे रंगवण्याचा काही जणांचा प्रयत्न नक्कीच धक्कादायक होता. यामुळेच भारतातील बहुसंख्याकांची ही जी न्याय्य मागणी होती तिला जातीय रंग आला असे मला वाटते. राम मंदिर व बाबरी मशीद तसेच राम व बाबर यांची तुलना संतापजनक होती. ज्याप्रमाणे जगभरातील मुस्लिमांसाठी मक्केतील काबा हे पवित्र स्थान आहे त्याचप्रमाणे रामाच्या जन्मस्थानाबाबतही कोटय़वधी हिंदूंच्या मनात आत्यंतिक श्रद्धा आहे, हे काही मुस्लीम संघटनांच्या नेत्यांना मान्य नव्हते. उलट, भारतीय मुस्लिमांना बाबरी मशिदीचे धार्मिकदृष्टय़ा तितके महत्त्व वाटत नव्हते. मक्केवर ज्याप्रमाणे मुस्लिमांचा हक्क आहे, व्हॅटिकनवर ख्रिश्चनांचा, तशीच अपेक्षा अयोध्येतील राम मंदिराच्या बाबतीत हिंदूंची असल्यास गैर ते काय?’

अयोध्या आंदोलनाचे नेतृत्व करण्याचा निर्णय अडवाणींनी का घेतला?

त्या काळात अन्य अनेक नेत्यांच्या तुलनेत अडवाणी हे बुद्धिवादी राजकारणी होते. त्यांचे वाचन अफाट आहे. एका पत्रकाराने त्यांना ‘तुमच्या आयुष्यात सर्वात मौलवान गोष्ट कोणती?’ असे विचारले असता त्यांनी एका शब्दात ‘पुस्तक’ असे उत्तर दिले होते. अयोध्येतील राम मंदिराचा विषय हा धर्म, इतिहास, राजकारण, कायदा, कला, संस्कृती, पुरातत्त्व तसेच राष्ट्रीयत्वाशी निगडित असल्याने रामजन्मभूमीच्या बाजूने युक्तिवाद करताना त्यांनी आपल्या आत्मचरित्रात अनेक पुस्तके व कागदपत्रांचे संदर्भ दिले आहेत. मध्ययुगीन काळात मुस्लीम आक्रमकांनी हिंदू मंदिरे कशी उद्ध्वस्त केली, तसेच सोमनाथ मंदिरावर मोहम्मद गझनीने वारंवार केलेल्या आक्रमणांचे विस्तृत वर्णन त्यात आहे.

सरदार पटेल यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यानंतर सोमनाथ मंदिराची उभारणी करण्यात आली. अयोध्या आंदोलनात अडवाणींसाठी हीच बाब प्रेरणादायी ठरली. त्यांच्या मते, कमकुवत राष्ट्र जर परकीय हल्ल्यांचा सामना करू शकत नसेल तर राजकीय स्वातंत्र्यापेक्षाही अधिक काही गमावण्याचा धोका असतो. विशेषत: सांस्कृतिक वारसा गमावण्याचा! त्यामुळेच देशातील पवित्र क्षेत्रांच्या दृष्टीने हजारो मंदिरांमध्ये ‘सोमनाथ’ हे वैशिष्टय़पूर्ण ठरते.

महत्त्वाचे म्हणजे सरदार पटेल यांना या मुद्दय़ावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही पाठिंबा मिळाला होता. त्यांच्या पुस्तकात ‘पाकिस्तान’ किंवा ‘पार्टिशन ऑफ इंडिया’ या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सोमनाथवरील हल्ल्यांचा संदर्भ दिला आहे. तसेच मोहम्मद गझनीचा इतिहासकार अल् उटबीची अवतरणे दिली आहेत. त्याने मंदिरे तोडून इस्लामची स्थापना केली. त्याने शहरे ताब्यात घेतली, मूर्तिपूजकांना नष्ट केले. त्यानंतर तो मायदेशी परतला आणि इस्लामच्या प्रसारासाठी आपण केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडला. आणि दरवर्षी हिंदुस्थानवर आक्रमण करून इथली पवित्र स्थळे ध्वस्त करण्याचा त्याने विडाच उचलला.

भारतातील विविध परंपरांचा सन्मान राखणं, सहिष्णुता आणि सर्व प्रकारच्या श्रद्धाभावांचा आदर बाळगणं महत्त्वाचं आहे. कारण एकमेकांप्रति असलेले अशा प्रकारचे सौहार्दपूर्ण संबंधच राम रथयात्रेदरम्यान अडवाणी यांना हिंदू मूलतत्त्ववाद्यांपासून दूर ठेवू शकले. अडवाणींचं हे अभियान मुस्लीमविरोधी असल्याचा आरोप झाला; मात्र अडवाणींनी त्याला ‘हे कणभरही सत्य नाही’ असे प्रत्युत्तर दिले आहे. या यात्रेदरम्यान जेव्हा कुणी मुस्लिमांविरोधात घोषणा द्यायचे तेव्हा अडवाणी त्वरित अशा घोषणांना विरोध करायचे. उदा. काही ठिकाणी ‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा’ अशी घोषणा दिली गेली तेव्हा अडवाणी त्याला विरोध करून म्हणत.. ‘‘जो राष्ट्रहित की बात करेगा, वही देश पे राज करेगा.’’

अडवाणींच्या या अभियानाला अनेक कृतक धर्मनिरपेक्षतावादी (स्यूडो सेक्यूलर) जातीय व धार्मिक पूर्वग्रहातून विरोध करणार, टीका करणार याची त्यांना पुरेपूर कल्पना होती. खरे तर अशा कृतक धर्मनिरपेक्षतावाद्यांशी दोन हात करणे, हीदेखील या अभियानामागची एक प्रेरणा होती. तोही त्यांचा उद्देश होता.

‘भारताचा आत्मा बोलला’ या त्यांच्या अयोध्येवरील प्रकरणात निष्कर्षांप्रत येताना ते पुन्हा मैत्रीपूर्ण, सौहार्दपूर्ण संबंधांच्या मुद्दय़ाकडेच वळताना दिसतात. ‘मुस्लिमांनीही हिंदूंप्रमाणे उदारता दाखवावी,’ असे आवाहन ते करतात. ते असेही म्हणतात, ‘‘राम हे हिंदूंचं पवित्र धार्मिक श्रद्धास्थान असेल, मात्र ते भारताच्या सांस्कृतिक वारशाचंही प्रतीक आहे.. जे हिंदू आणि मुस्लीम दोघांचंही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, अयोध्येचा हा प्रश्न हिंदू-मुस्लीम दोघांच्या एकत्रित प्रयत्नांतून मार्गी लागेल आणि त्याद्वारे सामंजस्य व राष्ट्रीय अखंडतेचा नवा अध्याय लिहिला जाईल.’’

आता अयोध्येचा प्रश्न अडवाणींना जसा अपेक्षित होता तशाच प्रकारे मार्गी लागला आहे. न्यायिक प्रक्रियेतून, न्यायालयीन निर्णयाद्वारे या प्रश्नावर तोडगा निघाला आहे. मात्र, यातला विरोधाभास असा की, ज्या नेत्याने आपल्या पक्षाला अयोध्या अभियानाद्वारे राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले, त्या पक्षाच्या नेत्यांनी मात्र त्यांच्या या कर्त्यांधर्त्यांलाच राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रापासून परिघावर लोटले. त्यांच्याच पक्षाने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना कमकुवत केले. २००५ मध्ये भारत-पाक मैत्रीसंबंध प्रस्थापित करताना अडवाणींनी जी भूमिका मांडली, तेव्हापासून त्यांना एकटे पाडण्यात आले.

अडवाणी हे खरे तर फाळणीची झळ बसलेले पीडित. (आयुष्यातील सुरुवातीची २० वर्षे त्यांनी कराचीत व्यतीत केली आहेत.) त्यामुळेच अडवाणींनी हिंदू-मुस्लीम संबंध आणि भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले. इथे पुन्हा एक विरोधाभास म्हणजे हिंदू-मुस्लीम संबंध सुधारण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे ज्यांनी कौतुक केले, त्यांनीच त्यांच्या भारत-पाकिस्तान संबंधांसाठीच्या प्रयत्नांवर टीकाही केली. याउलट, भारत-पाकिस्तान सौहार्दपूर्ण संबंधांकरता ज्यांनी त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली, त्याच लोकांकडून हिंदू-मुस्लीम संबंधांतील त्यांच्या भूमिकेसंबंधात टीकेचे आसूड ओढले. मला आशा आहे की, अडवाणींचे कौतुक करणारे तसेच त्यांच्यावर टीका करणारे यांच्यापेक्षा इतिहास त्यांच्या कार्याची अधिक उदारपणे चिकित्सा करील.

sudheenkulkarni@gmail.com