अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन आणि रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी या दिवशी केली जाणार आहे. अयोध्येत मंदिर बांधलं जाण्याची दीर्घ प्रतीक्षा संपली आहे. अयोध्येत राम मंदिर बांधलं जावं यासाठी रथयात्रा काढण्यात आली होती. या रथयात्रेचे प्रमुख होते ते म्हणजे लालकृष्ण आडवाणी. लालकृष्ण आडवाणी यांना राम मंदिर उद्घाटन सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. ते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्याआधी त्यांनी राम मंदिरावर लेख लिहिला आहे.
लालकृष्ण आडवाणी यांनी काय म्हटलं आहे?
‘राम मंदिर का निर्माण-एक दिव्य स्वप्न की पूर्ति’ हे शीर्षक देऊन आडवाणी यांनी लेख लिहिला आहे. त्यात ते म्हणतात, या ऐतिहासिक क्षणी मला अटलजींची (अटल बिहारी वाजपेयी) आठवण येते आहे. तसंच ते पुढे लिहितात, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक भारतीयाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. कारण ते आपल्या सगळ्यांच्या वतीनेच राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत आहेत. रामाचे गुण आपण अंगिकारावेत यासाठी हे मंदिर माझ्यासह प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारं ठरेल असंही आडवाणी यांनी त्यांच्या लेखात म्हटलं आहे.
हे पण वाचा- ‘बांधकाम अपूर्ण असलेल्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा’, काँग्रेसच्या या टीकेवर लेखक अमिश त्रिपाठींचं उत्तर; म्हणाले, “गाभाऱ्यात…”
आपल्या लेखात त्यांनी असाही उल्लेख केला आहे की हे मंदिर होणार असल्याचं नियतीने आधीच ठरवलं होतं. रथयात्रा सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच मला हे लक्षात आलं की माझी त्यातली भूमिका फक्त सारथ्य करण्याचीच होती. रथयात्रेचा संदेश हा त्या रथानेच दिला. कारण मंदिर पूर्ण व्हावं यासाठीच ही रथयात्रा काढण्यात आली होती. NDTV ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. लालकृष्ण आडवाणी यांचा हा लेख ‘राष्ट्रधर्म’ मध्ये १५ जानेवारी २०२४ या दिवशी छापून येणार आहे. राम मंदिराची रथयात्रा आंदोलनाचं रुप घेईल हे आम्हाला माहीत होतं. माझ्या राजकीय कारकिर्दीत रथयात्रेने मोठा बदल घडवला असंही त्यांनी लेखात म्हटलं आहे.