Lalit Modi Vanuatu Passport : इंडियन प्रीमियर लीग अर्थात ‘आयपीएल’चे माजी अध्यक्ष ललित मोदी हे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याचे कारण म्हणजे ललित मोदी यांनी त्यांचा भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज केला असल्याची माहिती समोर आली होती. तसेच ललित मोदींनी आता वानुआटू (Vanuatu) या देशाचं नागरिकत्व स्वीकारल्याचे देखील सांगण्यात आले होते. मात्र आता त्यांना मोठा धक्का बसला आहे. वानुआटूचे पंतप्रधान जॉथम नापत (Vanuatu Prime Minister Jotham Napat) यांनी सोमवारी सिटीझनशीप कमिशनला ललिल मोदी यांचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण पॅसिफिक बेट राष्ट्र वानुआटूचे नागरिकत्व प्रत्यार्पणापासून बचाव करण्यासाठी घेतल्याचा आरोप नापत यांनी केला आहे.
आयपीएलच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणात ललित मोदी भारतीय तपास यंत्रणांना हवा आहे, याबद्दल आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तांमधून माहिती समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. “मी सिटीझनशीप कमिशनला ललित मोदीचा वानुआटु पासपोर्ट रद्द करण्याची कार्यवाही ताबडतोब सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत,” अशी माहिती पंतप्रधान नापट यांनी एका अधिकृत निवेदनात दिली आहे.
ललित मोदींच्या नागरिकत्वाच्या अर्जाची सखोल तपासणी करण्यात आली होती, ज्यामध्ये इंटरपोलच्या स्क्रिनिंगचा देखील समावेश होता. मात्र त्यावेळी कोणतेही गुन्हा सिद्ध झालेला नसल्याने त्यामध्ये काहीही आढळून आले नाही. पुरेशा कायदेशीर पुराव्यांच्या अभावामुळे इंटरपोलने दोन वेळा भारताची ललित मोदीविरोधात अलर्ट नोटीस जारी करण्याची विनंती फेटाळून लावली. याबाब नुकतीच काही रिपोर्टमधून उघड झाली आहे. दरम्यान असा अलर्ट जारी करण्यात आला असता तर ललित मोदीचा नागरिकत्वाचा अर्ज आपोआपच फेटाळला गेला असता.
“मला गेल्या २४ तासांपूर्वी कळविण्यात आले की कोणतेही ठोस न्यायालयीन पुरावे उपलब्ध नसल्यामुळे इंटरपोलने भारतीय अधिकाऱ्यांनी ललित मोदी विरोधात अलर्ट नोटीस जारी करण्याची विनंती दोनदा नाकारली. अशा अलर्टमुळे मोदींचा नागरिकत्वासाठीचा अर्ज आपोआपच नाकारला गेला असता,” असे वानुआटूच्या पंतप्रधानांतर्फे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तसेच पंतप्रधान नापत यांनी निदर्शनास आणून दिले की वानुआटू देशाचे नागरिकत्व हा विशेष अधिकार आहे, हक्क नाही आणि अर्ज करणार्याने वैध कारणांसाठी मिळवावे. त्या वैध कारणांमध्ये प्रत्यार्पण टाळण्याचा प्रयत्न करणे याचा समावेश नाही. नुकतेच उजेडात आलेल्या माहितीनुसार स्पष्ट होते की ललित मोदीचा उद्देश तो आहे, असेही ते म्हणाले आहेत.
पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज
फरार उद्योगपती ललीत मोदीने ७ मार्च रोजी आपला भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज दाखल केला अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. ललित मोदींनी वानुआटूचे नागरिकत्व घेतल्याच्या वृत्तांवरील प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की, “लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात ललित मोदींनी भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज केला आहे. याची माहिती मंत्रालयाला माहिती देण्यात आली आहे. तसेच कायद्यानुसार ललित मोदींविरुद्ध असलेले सर्व खटले सुरु ठेवले जातील. सध्याच्या नियम आणि प्रक्रियांच्या आधारे सर्व तपासणी केली जाईल. आम्हाला असंही कळवण्यात आलं आहे की, ललित मोदींनी वानुआटुचे नागरिकत्व मिळवलं आहे” असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले होते.