दहा कोटी सदस्यांच्या नोंदणीनंतर जगातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या साम्राज्यासमोर शरणागती पत्करली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्यावर पदावर असताना भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. तेव्हा त्यांची गच्छंती करताना तत्कालीन अध्यक्ष नितीन गडकरी यांनी पर्यायी नावांचा विचार केला होता. राजस्थान भाजप व सरकारमध्ये राजे यांच्या विरोधात जाण्याची धमक असलेला एकही नेता नसल्याने अमित शहा यांच्यापुढे मोठा पेच उभा राहिला आहे. राजस्थानातील ‘राजे’शाहीला धक्का देण्यासाठी मुख्यमंत्री बदलाची चर्चा घडवून कुणा एका नेत्याचे नाव पुढे करण्याची शहा यांची रणनीती अयशस्वी ठरली आहे.
ललित मोदीप्रकरणी राजे यांचा राजीनामा घेतल्यास सरकार गडगडण्याची भीती शहा यांना आहे. त्यामुळे शहा यांनी राज्यातील विविध नेत्यांशी चर्चा केली होती. मात्र एकाही नेत्याने राजे यांना हटविण्यास अनुकूलता दर्शवली नाही. केंद्रीय भाजप नेत्यांनी राजे यांचा बचाव न करण्याची रणनीती आखल्यावर आता राजस्थानमध्ये स्थानिक नेते दररोज पत्रकार परिषदा घेऊन राजे यांची पाठराखण करीत आहेत.
राजे यांचे स्वतंत्र ‘संस्थान’ कसे खालसा करावे, यासाठी शहा चाचपणी करीत आहेत. मुख्यमंत्र्यास हटविताना कुणी तोलामोलाचा नेता राज्यात नसल्याने शहा यांनी राजे यांना तात्पुरते अभय दिले आहे. यापूर्वीदेखील राजे यांनी विरोधी बाकांवर असताना ज्येष्ठ भाजप नेते गुलाबचंद कटारीया यांच्याविरोधात बंड केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांशीदेखील राजे यांचा सकारात्मक संवाद नाही. त्यामुळे संघानेदेखील या प्रकरणी हस्तक्षेप करण्याचे टाळले आहे. विशेष म्हणजे संघटनेवर मजबूत पकड व कठोर निर्णय घेणारे अध्यक्ष अशी छबी असलेल्या शहा यांच्या काळात राजे यांच्या जागी चर्चेत येऊ शकेल असे एकही नाव राजस्थान भाजपमध्ये नाही. त्यामुळे दशकोट भाजप राजस्थानमध्ये ‘राजे’शाहीच्या वर्चस्वाखाली आला आहे.

Story img Loader