समस्त राजकीय पक्षाच्या नेत्यांवर कृपादृष्टी असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत झालेल्या गैरव्यवहारातील आरोपी ललित मोदी यांच्यामुळे आता काँग्रेसची पंचाईत झाली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधी व त्यांचे पती रॉबर्ट वढेरा यांची लंडनमध्ये भेट घेतल्याच्या ललित मोदी यांच्या ट्वीटनंतर स्पष्टीकरण देताना काँग्रेस नेत्यांची दमछाक झाली. आता खुद्द गांधी परिवाराचेच ललित मोदी यांच्याशी संबंध असल्याने भाजपमधील अस्वस्थता कमी झाली आहे. त्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी केलेली मोदींना केलेली मदत मानवतेच्या दृष्टीने ग्राह्य़ धरण्यावर भाजपाध्यक्ष अमित शहा विचार करीत आहेत.
वसुंधरा राजे यांचे खासदारपुत्र दुष्यंत यांच्या कंपनीला ललित मोदी यांनी दिलेले ‘मैत्रीपूर्ण’ कर्ज फेडण्यात आले आहे. २००७ मध्ये घेतलेले तीन कोटी रुपयांचे कर्ज २००९ मध्ये फेडण्यात आले. यासंबंधीचे दस्तावेज वसुंधरा राजे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दिले आहेत. या आधारावर राजे यांचा बचाव करता येऊ शकतो, असा दावा भाजप सूत्रांनी केला. अर्थात अंतिम आदेश पंतप्रधान मोदी यांच्याकडून येईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
भाजप प्रवक्ते संबीत पात्र यांनी प्रियंका गांधी ललित मोदी यांना भेटल्याचा आरोप केला. लंडनमध्ये ही भेट झाल्याचा दावा पात्रा यांनी केला. यापूर्वी ललित मोदी यांनी ट्वीटद्वारे या भेटीचा खुलासा केला. लंडनमधील एका उपाहारगृहात ही भेट झाली. काँग्रेसने मात्र ललित मोदी व भाजपवर पलटवार केला. ललित मोदी वसुंधरा राजे यांनी केलेल्या मदतीच्या प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी जाणीवपूर्वक खोटे आरोप करीत असल्याचे प्रत्युत्तर प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख रणदीप सुर्जेवाला यांनी दिले. ते म्हणाले की, मोठे मोदी (पंतप्रधान) छोटय़ा मोदींची मदत करीत आहेत. अशी कोणतीही भेट झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, कुणाला उपाहारगृहात पाहणे गुन्हा नाही. पण प्रियंका गांधी व त्यांचे पती रॉबर्ट वढेरा ललित मोदी यांना भेटलेले नाहीत.
भाजपवर दबाव
ललित मोदी यांच्या दररोजच्या गौप्यस्फोटांमुळे भाजपचे धाबे दणाणले आहे. पावसाळी अधिवेशन व बिहार निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सुषमा स्वराज, वसुंधरा राजे, स्मृती इराणी यांच्यामुळे नवनवे वाद होत असल्याने अमित शहांपुढे कठोर निर्णय घेण्याचे आव्हान आहे. कोणत्याही परिस्थिती किमान एका नेत्याचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नसल्याचा संदेश विरोधकांनी संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांना धाडला आहे. त्यामुळे विरोधकांची मनधरणी करण्याची कसरत नायडू सध्या करीत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा