सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी डोकेदुखी ठरलेले ललित मोदी प्रकरण आता कॉंग्रेसच्याही मानगुटीवर येऊन बसले आहे. इतके दिवस या विषयावरून भाजपवर टीका करणाऱया कॉंग्रेसवर शुक्रवारी स्वतःचाच बचाव करण्याची वेळ आली. त्याचे कारण होते ललित मोदी यांनी गुरुवारी रात्री केलेले ट्विट. गेल्यावर्षी आपण प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वद्रा यांची लंडनमध्ये स्वतंत्रपणे भेट घेतल्याचे ट्विट ललित मोदी यांनी केले. लंडनमध्ये एका रेस्तरॉंमध्ये ही भेट झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या भेटीवेळी डीएलएफचे व्यवस्थापकीय संचालक टिमी सारना हे ही तिथे उपस्थित होते, असे त्यांनी म्हटले आहे. ललित मोदी यांच्या या ट्विटमुळे कॉंग्रेसला बॅकफूटवर जावे लागण्याची शक्यता आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ललित मोदी यांना केलेली मदत आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे ललित मोदींसोबत असलेल्या जवळीकीवरून भाजपच्या या दोन्ही नेत्या वादाच्या भोवऱयात सापडल्या आहेत. कॉंग्रेसने या दोन्ही नेत्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ललित मोदी यांच्या नव्या ट्विटमुळे या विषयाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वद्रा या दोघांना भेटलो, त्यावेळी देशात कॉंग्रेसची सत्ता होती. त्याचबरोबर या भेटीबद्दल कोणालाही माहिती नसल्याचे ललित मोदी यांनी म्हटले आहे. दरम्यान, कॉंग्रेसने ललित मोदी यांचे सर्व आरोप फेटाळले असून, प्रियांका गांधी किंवा रॉबर्ट वद्रा यांनी ललित मोदींना भेटण्याचा प्रश्नच येत नाही, असे पक्षाने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा