भाजपानं आपली राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी यादी आज जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या चित्रा वाघ यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्या जबाबदारीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, यावेळी महत्त्वाचा बदल दिसला तो म्हणजे पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या बाबतीत. गेल्या वेळी लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना मार्गदर्शक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता त्यांचा समावेश राष्ट्रीय कार्यकारिणीत करण्यात आला आहे.
भाजपानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण ८० सदस्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य म्हणून पहिलं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे. पंतप्रधानांनंतर दुसरं नाव पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचं आहे. तर त्यांच्यापाठोपाठ तिसरं नाव मुरली मनोहर जोशी यांचं आहे. त्यामुळे आता हे दोन्ही नेते पक्षाच्या मुख्य प्रवाहात आल्याचं दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना मार्गदर्शक बनवून मुख्य राजकीय प्रवाहातून बाजूला काढल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. आता मात्र या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना पक्षानं पुन्हा एकदा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान दिलं आहे.
पक्षाकडून देण्यात आलेल्या यादीनुसार महाराष्ट्रातून चित्रा वाघ यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळालं आहे. राष्ट्रवादीमधून भाजपामध्ये आल्यानंतर चित्रा वाघ यांनी सातत्याने राज्यातील सत्ताधाऱ्यांवर विविध मुद्द्यांना धरून टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांचा भाजपाने राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यापाठोपाठ विजया रहाटकर यांचा गेल्या वेळी समावेश करण्यात आला होता, मात्र, आता त्यांचं नाव यादीतून काढण्यात आलं आहे. त्यासोबत विशेष निमंत्रित म्हणून सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार यांचा देखील राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.
आणखी वाचा – माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हिंदुजा रुग्णालयात दाखल, उद्धव ठाकरेंकडून प्रकृतीची विचारपूस
राज्यातील इतर भाजपा नेते
चित्रा वाघ, आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याव्यतिरिक्त प्रकाश जावडेकर, विनय सहस्त्रबुद्धे यांचा देखील कार्यकारिणीत सदस्य म्हणून समावेश आहे. त्यासोबत पदाधिकारी म्हणून विनोद तावडे (राष्ट्रीय मंत्री), सुनील देवधर (राष्ट्रीय मंत्री), पंकजा मुंडे (राष्ट्रीय मंत्री), हीना गावित (राष्ट्रीय प्रवक्त्या), जमाल सिद्दिकी (अल्पसंख्य मोर्चा), देवेंद्र फडणवीस (माजी मुख्यमंत्री) यांचा समावेश यादीमध्ये करण्यात आला आहे.