इंडिया अगेन्स्ट करप्शन या संघटनेचे कार्यकर्ते व नवीन राजकीय पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल हे अमेरिकेचे हस्तक आहेत, असा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज केला.
परिवर्तन रॅलीत जनसमुदायापुढे बोलताना ते म्हणाले की, केजरीवाल हे स्वयंसेवी संस्था चालवण्याच्या नावाखाली अमेरिकेचे हस्तक म्हणून काम करीत आहेत. केजरीवाल व भाजप अध्यक्ष नितीन गडकरी हे मानसिक आजारी व्यक्ती आहेत व त्यांना बरे करण्यासाठी बाबा रामदेव यांच्या योग शिबिरात पाठवले पाहिजे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे आपण धर्मनिरपेक्ष नेते असल्याचा खोटा देखावा तयार करीत आहेत, त्यांचा खरा चेहरा कळल्यामुळे आता लोक परिवर्तन रॅलीकडे वळले आहेत. माझ्याकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर नितीशकुमार जातीयवादी असलेल्या रा.स्व.संघाच्या मांडीवर जाऊन बसले, असे लालूप्रसाद म्हणाले.
आजच्या मेळाव्यात माजी मंत्री रघुवंशप्रसाद सिंग व महंमद तस्लीमुद्दीन यांची भाषणे झाली. राजद प्रमुख रामचंद्र पुरबे व आमदार अशरूल इमाम यांनीही मार्गदर्शन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalu prasad heaps scorn on arvind kejriwal dubs him agent of america