अवघ्या आठवड्याभरापूर्वी बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. नितीश कुमार यांनी एकाच टर्ममध्ये तिसऱ्यांदा बाजू बदलून पुन्हा एकदा भाजपाशी घरोबा केला. लालू प्रसाद यादव यांच्या राजदशी काडीमोड घेत नितीश कुमार यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर पुन्हा शपथ घेतली आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमधील राजकीय परिस्थितीवर व नितीश कुमार यांच्या वारंवार बाजू बदलण्याच्या वृत्तीवर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या. यासंदर्भात जेव्हा लालू प्रसाद यादव यांना विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यांनी खास त्यांच्या शैलीत उत्तरं दिली!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लालू प्रसाद – नितीश कुमार आमने-सामने!

बुधवारी बिहारमध्ये लालूप्रसाद यादव व नितीश कुमार एकमेकांसमोर आल्याची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली. लालूप्रसाद यादव विधानसभेत आले असताना समोरून नितीश कुमार पायऱ्या उतरून खाली येताना त्यांना दिसले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र व बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हेही होते. यावेळी तुम्ही नितीश कुमार यांना काय सांगितलं? अशी विचारणा लालू प्रसाद यादव यांना पत्रकारांनी केली असता ते म्हणाले, “तेव्हा नितीश कुमार पायऱ्यांवरून खाली उतरत होते आणि आम्ही वर चढत होतो. आम्ही त्यांनाही शुभेच्छा दिल्या”, असं लालू प्रसाद यादव म्हणाले.

दरम्यान, यावेळी पत्रकारांनी नितीश कुमार यांनी वारंवार बाजू बदलल्याचा मुद्दा विचारला असता “आता त्यांना सवयच आहे तर त्याला काय करणार?” असा प्रश्न लालू प्रसाद यादव यांनी केला.

Video: “राजा दशरथाप्रमाणेच नितीश कुमारांचाही नाईलाज, आम्हाला वनवास…”, तेजस्वी यादव यांची बिहार विधानसभेत टोलेबाजी!

नितीश कुमार – लालू प्रसाद पुन्हा एकत्र येतील?

नितीश कुमार यांनी २०२०मध्येही राजदला सोडचिठ्ठी देऊन भाजपाशी संसार थाटला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी तेच केल्यानंतर “आता मी तिकडे जाणार नाही” असं त्यांनी भर विधानसभेत पुन्हा एकदा सांगितलं. यासंदर्भात लालू प्रसाद यादव यांना पत्रकारांनी विचारणा केली. जर नितीश कुमार पुन्हा एनडीए सोडून तुमच्याकडे आले, तर तुम्ही काय कराल? या प्रश्नावर लालू प्रसाद यादव त्यांच्या खास शैलीत म्हणाले, “अब वो फिर से आएंगे तो देखेंगे. हमारे दरवाजे तो हमेशा खुले ही रहते है”. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांनी पुन्हा नितीश कुमार आले तर त्यांच्याशी पुन्हा युती करण्यासाठी तयार असल्याचेच सूतोवाच दिल्याचं बोललं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

दरम्यान, यावेळी लालूप्रसाद यादन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. “सध्या देशात राजधर्म, कर्म, रोजगार असे सगळेच मुद्दे संपले आहेत. आता मोदीजी फक्त प्रभू श्रीरामाचंच नाव घेत आहेत”, असं लालू प्रसाद यादव म्हणाले.

राहुल गांधींच्या यात्रेला पाठिंबा मिळतोय, ते पंतप्रधान होऊ शकतात असं वाटतं का? असं विचारलं असता, “राहुल गांधींमध्ये काय कमी आहे?” असा प्रतिप्रश्नच त्यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalu prasad yadav hints ready for alliance with nitish kumar again pmw
Show comments