नरेंद्र मोदींना बाजूला काढून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनाच पंतप्रधान व्हायचे आहे, असा खळबळजनक आरोप राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. त्यांच्या या आरोपामुळे बिहारमधील विधानसभा निवडणुकीत नव्याच चर्चेला तोंड फुटले आहे. बोलण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या लालूप्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, बिहारमध्ये कोणत्या आघाडीला निवडून द्यायचे, याचा निर्णय जनतेने केला आहे. बिहारमध्ये आघाडीचे सरकार आले, तर सर्वांत मोठा धोका मोदींनाच आहे. अमित शहा यांना मोदींना बाजूला काढून पंतप्रधान बनायचे आहे. त्यामुळे मोदींनी सावध झाले पाहिजे.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. नरेंद्र मोदी हे पहिल्यापासूनच आरक्षण आणि दलितांच्या विरोधात आहेत. मोहन भागवतांच्या त्या वक्तव्याचा नरेंद्र मोदींनी निषेध का केला नाही, असा प्रश्न लालूप्रसाद यादव यांनी उपस्थित केला. दलितांना आणि गरिबांना गुलाम बनवण्याचे षडयंत्र मोदी सरकारने आखले असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर खासगी क्षेत्रातही आरक्षण दिले गेले पाहिजे, अशी मागणी केली.

Story img Loader