राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना काँग्रेस आणि लोकजनशक्ती पार्टी दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असली लालूप्रसाद यादव यांनी मात्र त्या दोन्ही पक्षांची भरभरून स्तुती केली आहे. जातीयवादी शक्तींपासून देशाला धोका असल्याने आपल्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत लालूप्रसाद ठणकावून मांडत आहेत. काँग्रेस पक्ष ही अनेक धर्मनिरपक्ष पक्षांना आपल्या छत्रछायेखाली घेणारी संघटना असून सध्या देशाला त्यांचीच गरज आहे. लोकजनशक्तीचे नेते रामविलास पासवान हे सभ्य गृहस्थ आहेत, मात्र त्यांच्या सभोवताली वावरणारे टोळके त्यांना योग्य निर्णय घेण्यापासून परावृत्त करीत आहेत, असेही लालूप्रसाद यांनी म्हटले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे आतापर्यंत भाजपशी संधान बांधून होते आणि आता ते धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा करीत आहेत, अशी टीकाही लालूप्रसाद यांनी केली. रामविलास पासवान आणि आपले उत्तम संबंध आहेत. आम्ही नेहमीच अनेक प्रश्नांवर चर्चा करतो. पासवान यांच्या पक्षाशी राजद युती करणार नाही, असे आपण कधीही म्हटले नाही, असेही लालू  म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalu prasad yadav showers praise on congress describes ram vilas paswan as gentleman