जमीनीच्या बदल्यात नोकरी योजनेतील घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने शुक्रवारी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांच्या आणि नातेवईकांच्या घरांवर धाडी टाकल्या. दिल्ली, एनसीआर, पटना, रांची आणि मुंबईसह वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. ईडीच्या या कारवाईनंतर लालू प्रसाद यादव संतापले आहेत. राष्ट्रीय जनता दलचे सुप्रीमो लालू यादव यांनी सांगितलं की, तेजस्वी यादव यांची गर्भवती पत्नी राजश्री यादव यांनादेखील त्रास दिला.
Land For Job Scam प्रकरणी तपसासाठी ईडीने लालू आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापेमारी केली. ही ED Raid १२ ते १६ तास चालली. यानंतर काल रात्री लालू यांनी ट्वीट करून संताप व्यक्त केला. लालू यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “आम्ही आणीबाणीचा काळसुद्धा पाहिला आहे. आम्ही ती लढाई लढलो आहोत. बिनबुडाच्या आणि बदल्याच्या भावनेतून सुरू केलेल्या प्रकरणांमध्ये आज माझ्या मुली, नातवंडं आणि गर्भवती सून यांना भाजपा आणि ईडीने तब्बल १५ तास बसवून ठेवलं आहे. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन भाजपा आमच्याशी राजकीय लढाई लढणार का?”
नतमस्तक होणार नाही : लालू
लालूंनी आणखी एक ट्वीट करून त्यात लिहिलं आहे की, “संघ आणि भाजपाच्या विरोधात माझी लढाई सुरू आहे आणि ती सुरूच राहील. त्यांच्यासमोर मी कधी गुडघे टेकले नाहीत. माझं कुटुंब आणि पक्ष किंवा कोणतीही व्यक्ती यांच्या राजकारणासमोर नतमस्तक होणार नाही.”
हे ही वाचा >> मनीष सिसोदियांचा पाय खोलात, सात दिवस ED च्या कोठडीत, CBI प्रकरणी २१ मार्चला सुनावणी
सिंगापूर येथे किडनी ट्रान्सप्लांट (मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया) केल्यानंतर लालू यादव नुकतेच भारतात परतले आहेत. लालू सध्या त्यांची मोठी मुलगी मीसा भारती यांच्या दिल्लीतल्या घरी राहात आहेत.