राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. मुंबईत आम्ही आता नरेंद्र मोदींच्या मानगुटीवर बसायलाच जात आहोत. नरेंद्र मोदी गादी पकडून बसले आहेत मानगुट पकडून त्यांना तिथून उठवायचं आहे या आशयाचं वक्तव्य लालूप्रसाद यादव यांनी केलं. मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर असे दोन दिवस इंडियाची बैठक पार पडते आहे. या बैठकीसाठी लालूप्रसाद यादव मुंबईत निघाले होते. त्याआधी त्यांनी पत्रकारांशी ही चर्चा केली. त्यांच्यासह बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही होते.
लालूप्रसाद यादव यांची मोदींवर टीका
लालूप्रसाद यादव यांनी भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. आज लालूप्रसाद यादव हे विमानतळावर आले होते. लालूप्रसाद यादव म्हणाले की मुंबईत आम्ही आता नरेंद्र मोदींच्या मानगुटीवर बसायलाच चाललो आहे. नरेंद्र मोदींना आता हटवायचं आहे असा निर्धारच आम्ही केला आहे असंही लालूप्रसाद यादव यांनी सांगितलं आहे.
भाजपाची झोप उडाली आहे
लालूप्रसाद यादव यांनी असंही म्हटलं आहे जेव्हापासून आमच्या आघाडीने INDIA हे नाव घेतलं आहे तेव्हापासून भाजपाची झोप उडाली आहे. भाजपाच्या विरोधात संपूर्ण देशभरात आम्ही ताकदीने लढणार आहोत. प्रत्येक जागेसाठी थेट लढत होईल. एकीकडे भाजपा आणि त्यांच्याविरोधात इंडियाचा उमेदवार असणार आहे. २०२४ मध्ये नरेंद्र मोदी पदावरुन हटणार आहेत हे नक्की आहे असंही लालूप्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातल्या मुंबईत आमची बैठक होणार आहे. या बैठकीत बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मानणारे लोक एकत्र येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना घटना आणि संविधान नको आहे. या देशाचं अखंडत्व आम्ही संपू देणार नाही. गावागावांमध्ये आम्ही प्रत्येक बुथवर आम्ही बाबासाहेबांचा विचार पोहचवणार आहोत असंही लालूप्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.