केंद्र व राज्य सरकारने देशातील भूमीहीन कुटुंबांना प्रत्येकी पाच एकर जमीन द्यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. अशी योजना अमलात आणण्याबाबत ठराव करण्यात आला आहे, अशी माहितीही आठवलेंनी दिली. त्यामुळे आगामी काळात देशातील भूमीहीन कुटुंबाना पाच एकर जमीन मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले म्हणाले, “देशातील गावागावांत भूमीहीन लोकं आहेत. अशा लोकांना पाच एकर जमीन वाटण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावा. देशात जवळपास २० कोटी एकर सरप्लस जमीन आहे. ही जमीन देशातील चार कोटी भूमीहीन कुटुंबाना वाटावी. राज्य सरकारनेही आपल्या राज्यातील जमीन विकत घेऊन ती भूमीहीन लोकांना द्यावी. अशा पद्धतीची योजना राबवावी, असा ठराव करण्यात आला आहे.”
“त्याचबरोबर देशातील बेरोजगार लोकांना रोजगार देण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतली आहे. मोदींनी दहा लाख लोकांना रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अभिनंदनीय आहे,” असंही रामदास आठवले म्हणाले.