Landslide in Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मणिकर्ण गुरुद्वाराजवळ भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती देखील सांगितली जात आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मणिकर्ण येथे ही घटना घडली.

या घटनेत हिमाचलमधील मणिकर्णमध्ये भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार ६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, गुरुद्वाराजवळ एक झाड पडल्याने ६ जणांना जीव गमवावा लागला आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटवण्यात येत आहे. या संजर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

या घटनेत जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच त्या ठिकाणी ही घटना घडली तेथे बचावकार्यही सुरू आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार मणिकर्ण गुरुद्वाराजवळ आधी भूस्खलनाची घटना घडली. त्यानंतर भूस्खलनामुळे एक मोठं झाड कोसळलं. पण जे झाड कोसळलं त्या झाडाखाली आणि रस्त्याच्या बाजूला काही लोक बसलेले होते.

जेव्हा हे झाड पडलं तेव्हा त्या झाडाखाली असलेल्या चार वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच त्या वाहनात असलेले काही नागरिक देखील जखमी झाले आहेत. माहितीनुसार, भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये रस्त्याच्या कडेला असलेला फेरीवाला आणि कार चालक व घटनास्थळी उपस्थित असलेले तीन पर्यटक यांचा समावेश मृतांमध्ये समावेश आहे.

दरम्यान, कुल्लूचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अश्वनी कुमार यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, भूस्खलनात ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. पोलिलांचं पथक घटनास्थळी पोहोचलं असून मदतकार्य सुरु आहे. अग्निशमन विभागाची एक टीम देखील अपघातस्थळी रवाना झाली. तसेच या घटनेत मृत्यू झालेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही, असं त्यांनी सांगितलं.