जगामध्ये भाषांचा इतिहास गेल्या सत्तर हजार वर्षांचा असून येत्या एक ते दोन हजार वर्षांनंतर शब्दभाषा लोप पावतील आणि प्रतिमा व रूपकांची नवी भाषा अस्तित्वात येईल, असे प्रतिपादन भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी रविवारी येथे केले.
घुमान साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या पहिल्या सत्राची सुरुवात डॉ. गणेश देवी यांच्या प्रकट मुलाखतीने झाली. सुषमा करोगल आणि अरुण जाखडे यांनी डॉ. देवी यांच्याशी संवाद साधला.
भविष्यात प्रतीकांची भाषा मोठय़ा प्रमाणात विकसित होईल. वाचेशिवाय भाषा असे त्याचे स्वरूप असण्याची शक्यता भाषा शास्त्रज्ञांना वाटत असल्याचे सांगून डॉ. देवी म्हणाले, लेखन हा प्रकार कदाचित निघून जाईल. गंभीर विषयावरील नोंदी करण्यासाठी किंवा आपले विचार व्यक्त करण्यासाठी नवीन साधने निर्माण होतील. आपल्या भाषेचे जतन आणि संवर्धन करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. ती फक्त शासनाची जबाबदारी नाही. तर संपूर्ण समाजानेही आपले योगदान त्यासाठी दिले पाहिजे.
आपल्या भावी उपक्रमाविषयी माहिती देताना ते म्हणाले, ‘समाजातील भाषाप्रेमी, भाषातज्ज्ञ आणि समाज व शासनाच्या साहाय्याने जगातील सर्व भाषांचे सर्वेक्षण करण्याची योजना मनामध्ये आहे. उद्यावर माझा अधिकार नसला तरी स्वप्नांवर मात्र माझा अधिकार आहे.’
वसाहतवादामुळे संस्कृती दडपली गेली, आता जागतिकीकरणाचा रेटा आणि परिणाम यामुळे लोकांची भाषा मारून टाकण्याचे काम सुरू झाले आहे. मार्केटची एक नवी भाषा तयार होत आहे. जगातील सुमारे सहा हजार भाषांपकी चार हजार भाषा येत्या तीस वर्षांत मरतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत असल्याचेही डॉ. देवी यांनी सांगितले.
मुलाखत संपल्यानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते डॉ. गणेश देवी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरिवद गोखले यांनी संपादित केलेल्या ‘कवितांचे वेचे-नवनीत’ या ग्रंथाचे पुनप्र्रकाशन डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते करण्यात आले. मोरोपंत ते ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, शेख महंमद आणि इतर संत व अन्य कवींच्या रचनांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा