चंद्राच्या पृष्ठभागावर एक मोठा उल्कापाषाण आदळला असून त्यामुळे तेथे मोठा स्फोट झाला. विशेष म्हणजे हा स्फोट पृथ्वीवरून नुसत्या डोळ्यांनी दिसला असे नासाने म्हटले आहे.
नासाच्या उल्कापाषाण विभागाचे बिल कुक यांनी सांगितले. की १७ मार्च २०१३ रोजी एका छोटय़ा दरडीइतक्या आकाराचा उल्कापाषाण चंद्राच्या मेअप इम्ब्रियम या भागात आदळला आहे. आतापर्यंत आम्ही जे स्फोट बघितले आहेत, त्याच्यापेक्षा यात १० पट अधिक प्रकाशमानता होती. त्या आघाताच्या वेळी जे लोक नुसत्या डोळ्यांनी चंद्राकडे पाहिले असेल त्यांना तो दिसला असणार हे उघड आहे त्यासाठी दुर्बिणीची गरज नव्हती. ४ प्रकाशमानता असलेल्या ताऱ्याइतका हा आघातमय भाग उजळून निघाला होता. मार्शल स्पेस फ्लाइट सेंटरचे रॉन स्युग्ज यांनी चंद्रावरील आघाताची डिजिटल व्हिडिओ तयार केली असून त्यासाठी १४ इंची दुर्बीण वापरली आहे. ४० किलो वजनाचा तसेच ०.३ ते ०.४ मीटर रुंद उल्कापाषाण चंद्रावर ताशी ९०१२३ किलोमीटर इतक्या वेगाने आदळला. त्यामुळे टीएनटीच्या ५ टन इतकी ऊर्जा स्फोटातून बाहेर पडली. १७ मार्चच्या रात्री नासा व वेस्टर्न ओंटारिओ यांनी आकाशाकडे रोखलेल्या कॅमेऱ्यात पृथ्वीकडे येणाऱ्या काही उल्काही दिसत आहेत असे त्यांनी सांगितले. काही अग्निहोल हे पृथ्वी व लघुग्रह पट्टय़ाच्या सारख्याच कक्षेत भ्रमण करताना दिसले याचा अर्थ चंद्र व पृथ्वी यांच्यावर एकाच वेळी उल्कापाषाणांचा मारा झाला असे दिसून येते. चंद्रावर उल्कापाषाण नेहमीच पडत असतात. त्यांचे निरीक्षण नासाने २००५ मध्ये सुरू केले. आतापर्यंत ३०० आघात नोंदवण्यात आले असून ते १७ मार्चच्या आघातापेक्षा कमी तीव्रतेचे होते. आताच्या आघाताने २० मीटर व्यासाचे विवर चंद्रावर तयार झाले असून नासाच्या ल्युनर रेकनसान्स ऑरबायटर या अंतराळयानाच्या मदतीने त्याचा अभ्यास केला जाणार आहे.

Story img Loader