स्वदेशी बनावटीची आजवरची सर्वात मोठी आणि अद्ययावत गस्तीनौका ‘समर्थ’ मंगळवारी गोव्यात झालेल्या कार्यक्रमात संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते तटरक्षक दलात सामील करण्यात आली. समर्थच्या आगमनाने तटरक्षक दलाची ताकद वाढली असून आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळाली असल्याचे पर्रिकर यांनी यावेळी सांगितले.
गोव्यातीलच गोदीत बांधण्यात आलेली ही २४५० टनी नौका अशा प्रकारच्या सहा नौकांच्या मालिकेतील पहिली नौका आहे. ती अद्ययावत नौकानयन तंत्रज्ञान, संवेदक, संचारयंत्रणा आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. त्यावर एक हेलिकॉप्टर आणि पाच लहान आकाराच्या वेगवान नौका ठेवता येतात. समुद्रात टेहळणी करण्याच्या आधुनिक उपकरणांसह समर्थवर प्रदूषण नियंत्रणासाठी उपयोगी उपकरणेही आहेत. त्यांच्या मदतीने समुद्रात तेलवाहू जहाजांना अपघात झाल्यावर पाण्यावर पसरणाऱ्या तेलाच्या तवंगावरही उपाययोजना करता येते. समर्थ ताशी २३ सागरी मैलांच्या वेगाने एका दमात ६००० सागरी मैलांचा प्रवास करू शकते. तिचे वास्तव्य तटरक्षक दलाच्या गोव्यातीलच तळावर राहणार असून तेथून ती अरबी समुद्रात दूरवर टेहळणीच्या मोहिमा हाती घेईल.
सध्या तटरक्षक दलाकडे विविध प्रकारच्या ११७ नौकांचा ताफा असून देशातील वेगवेगळ्या गोदींमध्ये आणखी ७४ नौकांची बांधणी सुरू आहे.
यावेळी पर्रिकर यांनी या वर्षांच्या सुरुवातीला अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्याजवळ सुरक्षा दलांनी उडवून दिलेल्या संशयित नौकेचाही उल्लेख केला. ‘त्या नौकेवर दहशतवादीच होते असे मी नेमकेपणाने म्हणणार नाही. पण जे कोणी होते ते मित्र नक्कीच नव्हते,’ असे पर्रिकर म्हणाले.

Story img Loader