आर्थिक संकटातून जाणा-या लार्सन अँड टुब्रोने एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत १४ हजार कर्मचा-यांना काढले आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.
इंजिनिअरिंग क्षेत्रातील आघाडीची कंपनी लार्सन अँड टुब्रो ही सध्या आर्थिक संकटातून जात आहे. सध्या कंपनीचा व्यवसाय समाधानकारक नाही. कंपनीची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी आणि कंपनीचे व्यवहार सुरळीत व्हावे यासाठी कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याची आवश्यकता होती असे सूत्रांनी सांगितले. कंपनीची आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी तुम्हाला बदल करावे लागतात. जी लोकं आम्हाला निरुपयोगी वाटत होती त्यांना कंपनीतून काढण्यात आले अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे. कंपनीतील विविध भागांमध्ये सुमारे सव्वा लाख कर्मचारी कार्यरत असून २०१६-१७ च्या पहिल्या आर्थिक तिमाहीत १४ हजार कर्मचा-यांची कपात करण्यात आली आहे.
कंपनीचा व्यवसायाकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन आहे. आम्ही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे. त्यामुळे आता १० ऐवजी ५ जणांचीच गरज भासते. कंपनीचा व्यवसाय थंडावला होता. अंमलबजावणीच्या प्रक्रियेत होणारा विलंब आणि अन्य गोष्टी यासाठी कारणीभूत ठरत होत्या असे कंपनीचे अधिकारी आर शंकर रमन यांनी सांगितले. कंपनीने त्यांचे बॅक ऑफीस डिजिटल करण्यावर भर दिल्याचे त्यांनी नमूद केले. आमचे काही व्यवसाय मंदावल होते. आणि त्यांची पुनर्रचना करणे गरजेचे होते. सध्याच्या स्पर्धात्मक युगात तुम्ही वेगवान, स्मार्ट आणि आगेकूच करत राहणे गरजेचे असते असे कंपनीचे डेप्युटी मॅनेजर एस एन सुब्रमण्यम यांनी सांगितले.
कर्मचारी कपात करण्याचा निर्णय एकदाच घेण्यात आला होता. मात्र कपातीचे कोणतेही टार्गेट ठेवण्यात आलेले नव्हते असे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. विशेष म्हणजे २०१७ च्या आर्थिक वर्षात कंपनीचे उत्पन्न ८.६ टक्क्यांनी वाढून ४५ हजार कोटींवर पोहोचले आहे. तर कंपनीचा नफा २ हजार ४४ कोटींवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी कंपनीला १ हजार १९७ कोटी रुपयांचा नफा झाला होता. एल अँड टी कंपनीने आगामी पाच वर्षात कंपनीचे उत्पन्न २ लाख कोटींवर पोहोचवण्यासाठी पंचवार्षिक योजनाच आखली आहे.