श्रीनगर : लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी जुनैद अहमद भट याला चकमकीत ठार करण्यात आल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी मंगळवारी दिली. जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्गजवळ गगनगीर येथे झेड-मोढ बोगद्याचे बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांमध्ये भटचा समावेश होता असे पोलिसांनी सांगितले. २० ऑक्टोबरला झालेल्या त्या दहशतवादी हल्ल्यात बांधकाम कंपनीच्या सात कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा >>> सरन्यायाधीशांची खटल्यातून माघार; निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेतील बदलाला याचिकांद्वारे आव्हान
श्रीनगर शहराबाहेर असलेल्या दाचिगाम जंगलामध्ये दहशतवादी वावरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने सोमवारी संध्याकाळी जंगलाची घेराबंदी केली. तेथे दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असताना जवानांवर गोळीबार झाला. त्यांनी त्याला उत्तर दिले. या चकमकीत भट ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गगनगीर घटनेचा तपास करताना सीसीटीव्ही चित्रण तपासताना पोलिसांना दोन हल्लेखोरांपैकी जुनैद भटची ओळख पटली होती. तो दक्षिण काश्मीरमधी कुलगाम येथील रहिवासी असून तो ‘अ’ सूचितील दहशतवाद्यांपैकी एक असल्याचे सांगण्यात आले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी एक्सवरून या चकमकीची माहिती दिली. जुनैद भट हा गगनगीर, गांदरबल आणि इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता असे त्यांनी त्यामध्ये स्पष्ट केले. भटच्या ताब्यात अमेरिकी बनावटीची एम-४ कार्बाईन ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.