लष्कर-ए-तैयबा या अतिरेकी संघटनेचा संस्थापक सदस्य आणि हाफिज सईदचा जवळचा सहकारी हाफिज अब्दुल सलाम भुट्टावी याचा मृत्यू झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने गुरूवारी दिली. भुट्टावीने मुंबईवर २००८ साली झालेल्या २६/११ च्या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजवाली होती. २९ मे २०२३ साली पाकिस्तानच्या तुरुंगात हृदयविकारामुळे त्याचा मृत्यू झाला होता. सात महिन्यानंतर या माहितीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. लष्कर-ए-तैयबा या संघटनेने २००८ साली मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात तब्बल १६६ लोकांचा मृत्यू झाला आणि ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेले होते. तसेच भारतानेही त्याचा ताबा पाकिस्तानकडे मागितला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या संकेतस्थळावर एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार ७७ वर्षीय भुट्टावीचा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके शहरातील तुरुंगात मृत्यू झाला. “मुरीदकेच्या कारावासात असताना हृदयविकाराच्या झटक्यामुळे २९ मे २०२३ रोजी भुट्टावीचा मृत्यू झाला. पाकिस्तान सरकारने त्याला कारावासात टाकले होते”, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

मुंबईतील हल्ल्यानंतर पाकिस्तानने हाफिज सईदला अटक केले होते. त्यानंतर लष्कर-ए-तैयबाच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा भुट्टावीकडून घेण्यात येत होता. जमात-उद-दावाचा म्होरक्या असलेल्या हाफिज सईदला पाकिस्तानने १२ फेब्रुवारी २०२० रोजी ७८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून तो कारावासात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटल्यानुसार, हाफिज सईद भुट्टावी हा २००२ पासून लाहोर येथून लष्कर-ए-तैयबाचा कारभार पाहत होता.

Story img Loader