देशात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. काल देशात ४ महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या आढळली होती. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आज पुन्हा ४० हजाराच्यावर रुग्णसंख्या आढळली आहे. देशात कालच्या तुलनेत ४७ टक्के रुग्णवाढ झाली आहे. गेल्या तीन आठवड्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ४३ हजार ६५४ नवीन करोना रुग्ण आढळले. तर ६४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
त्याचबरोबर, गेल्या २४ तासात ४१ हजार ६७८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सध्या देशात ३ लाख ९९ हजार ४३६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत देशात ३ कोटी ०६ लाख ६३ हजार १४७ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर ४ लाख २२ हजार ०२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
India reports 43,654 fresh COVID cases, 41,678 recoveries, and 640 deaths in the last 24 hours
Active cases: 3,99,436
Total recoveries: 3,06,63,147
Death toll: 4,22,022Total vaccination: 44,61,56,659 pic.twitter.com/C6bBRNXgVb
— ANI (@ANI) July 28, 2021
राज्यात नव्या रुग्णसंख्येत घट
राज्यात करोना रुग्ण संख्येत झपाट्याने घट होत असून रुग्ण बरे होण्याचं प्रमण ९६.५४ टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात आज १२ हजार ६४५ रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा ६० लाख ५८ हजार ७५१ वर पोहोचला आहे. तर आज बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत नव्या रुग्णांची संख्या कमी होती. राज्यात ६ हजार २५८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण ८२,०८२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात मागच्या २४ तासात २५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे .सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे. सध्या राज्यात ४,९८,९३३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,४५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,७१,७६,७१५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,७६,०५७ (१३.३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत गेल्या २४ तासात ३४३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४६६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ लाख ११ हजार ३१५ वर पोहोचली आहे. आता मुंबईत सध्या ५ हजार २६७ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर १,३७७ दिवसांवर पोहोचला आहे. तर २० जुलै ते २६ जुलै दरम्यान रुग्णवाढीचा दर हा ०.०५ टक्के इतका होता.
२२ जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा वेग अधिक!
केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना देशातील २२ जिल्ह्यांविषयी चिंता व्यक्त केली आहे. “देशात असे २२ जिल्हे आहेत, जिथे वेगाने रुग्णवाढ होत आहे. यामध्ये केरळमधील ७ जिल्हे, मणिपूरमधील ५ जिल्हे आणि मेघालयातील ३ जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे”, असं ते म्हणाले. गेल्या ४ आठवड्यांमध्ये प्रामुख्याने या जिल्यांमध्ये वेगाने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्याची जास्त चिंता आहे, असं देखील लव अग्रवाल यांनी नमूद केलं आहे.