मृतांमध्ये पाच उच्चशिक्षित तरुण
स्फोटात गुरुवारी मरण पावलेला विजय कुमार केंद्रीय अबकारी खात्यातील उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेसाठी तयारी करीत होता. या परीक्षेच्या तयारीसाठी लागणारी आणखी काही पुस्तके खरेदी करण्यासाठी गेला असता नियतीने त्याच्यावर घाला घातला. ही पुस्तकखरेदीची ‘ट्रिप’ विजय कुमारसाठी अखेरचीच ठरली!
येथील दिलसुखनगर या गजबजलेल्या भागात गुरुवारी सायंकाळी पाच मिनिटांच्या अंतराने झालेल्या दोन शक्तिशाली स्फोटांत आतापर्यंत १६ जण मारले गेले असून, त्यात पाच उच्चशिक्षित तरुणांचा समावेश आहे. विजय कुमारसह आलेला अझाझ अहमद हाही या ठिकाणी पुस्तकखरेदीसाठीच आला होता. अझाझ हा खम्माम जिल्ह्य़ातील कोट्टागुडमचा आहे. या दोघांबरोबरच एमबीए करणारा राजशेखर, कोट्टापेट वसाहतीत राहणारा अभियांत्रिकी शाखेचा हरीश आणि एमबीएची तयारी करीत असलेली स्वप्ना या स्फोटांत मरण पावले आहेत. गुरुवारी मरण पावलेल्या १४ जणांपैकी १३ जणांची ओळख पटली आहे. जखमी ११९ जणांपैकी बहुसंख्य हे १९ ते २२ वयोगटातील आहेत. हा परिसर अत्यंत गजबजलेला भाग म्हणून ओळखला जातो व शहराच्या सर्व भागात जाता येऊ शकेल अशी बससेवा या ठिकाणी आहे. या भागात अनेक शैक्षणिक संस्था व व्यापारी संकुलेही असून संशयित दहशतवाद्यांनी गेल्या १० वर्षांत येथे दुसऱ्यांदा स्फोट घडवून आणले आहेत. या अगोदर येथील साईबाबा मंदिराजवळ स्फोट घडवून आणण्यात आला होता. त्यात दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.
दरम्यान, राज्य भाजपतर्फे शुक्रवारी स्फोटांच्या निषेधार्थ राज्यस्तरीय बंदचे आवाहन करण्यात आल्याचे पक्षाचे येथील अध्यक्ष जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा