नवी दिल्ली : चीनमधून वार्ताकन करणाऱ्या अखेरच्या भारतीय पत्रकाराला महिना अखेरीस देश सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे. या वर्षी चीनमध्ये भारताचे चार पत्रकार होते. एप्रिलमध्ये त्यापैकी दोन पत्रकारांचे व्हिसा गोठवण्यात आले आणि त्यांना चीनमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली.गेल्या आठवडय़ात अन्य एका पत्रकाराने बीजिंग सोडले. आता तिथे उरलेल्या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेच्या एकमेव पत्रकारालाही या महिन्याच्या अखेरीस चीन सोडण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या व्हिसाची मुदत संपत असून ती वाढवून देण्यास चीनने नकार दिला आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या देशामध्ये भारताचा एकही पत्रकार असणार नाही.
चीनच्या पत्रकारांना भारतामध्ये योग्य सहकार्य मिळाले नाही, असा आरोप चीनने केला होता. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने हा आरोप फेटाळला आहे. चीनच्या पत्रकारांसह सर्व परदेशी पत्रकारांना भारतात कोणत्याही अडथळे किंवा मर्यादेविना वार्ताकन करता येत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. उलट चीनमध्ये स्थानिक लोकांना पत्रकार म्हणून नेमण्याची परवानगी मिळत नाही असे त्यांनी नमूद केले.