सौरभ कुलश्रेष्ठ

मतदार नोंदणीचे प्रमाण वाढावे यासाठी निवडणूक आयोगाने मतदानाच्या काही दिवस आधीपर्यंत घेतलेल्या मतदार नोंदणी शिबिरांना-ऑनलाइन नोंदणीला महाराष्ट्रात लक्षणीय प्रतिसाद लाभला असून फेब्रुवारी २०१९ ते एप्रिल २०१९ या शेवटच्या तीन महिन्यांत राज्यात तब्बल १३ लाख ७० हजार ७७५ मतदारांची नोंदणी झाली. राज्यातील पाच मतदारसंघांत ५० हजारांहून अधिक मतदार नोंदणी झाली असून सर्वाधिक ७५ हजार ६२२ मतदारांची वाढ पालघर मतदारसंघात झाली तर सर्वात कमी १४ हजार १३० मतदार गडचिरोली-चिमूर मतदारसंघात वाढले.

सर्व ४८ मतदारसंघांत मतदान मागील निवडणुकीपेक्षा जास्त झाल्याचे दिसून आले. निवडणूक आयोगाने मतदार जागृतीबाबत राबवलेल्या मोहिमांचा चांगला परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. जानेवारी २०१९ मध्ये मतदारयादी जाहीर केल्यानंतर पुरवणी मतदारयादीसाठी शिबिरे भरवण्यात आली. त्यात पालघरमध्ये ७५ हजार ६२२ मतदारांची वाढ झाली. त्याखालोखाल मावळमध्ये ७१ हजार ८९७ मतदारांची, ठाण्यात ६४ हजार ६१५ मतदारांची, शिरूरमध्ये ६४ हजार ३९६ मतदारांची तर पुण्यात ५१ हजार ६४ मतदारांची नोंद शेवटच्या तीन महिन्यांत झाली. भंडारा-गोंदिया मतदारसंघात २० हजार ६३० मतदारांची नोंद झाल्याचे आकडेवारी सांगते.

राज्यातील मतदार यादीत अधिकाधिक मतदारांची नोंदणी होण्यासाठी २०१८च्या अखेरीस पहिली मोहीम राबवण्यात आली. त्यात ३५ लाख ७१ हजार ८७५ मतदारांची नोंदणी झाली होती. त्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये ही यादी जाहीर करून फेब्रुवारीपासून आणखी एक मोहीम राबवण्यात आली होती.

मतदारसंघ मतदार नोंदणी वाढ

पालघर ७५ हजार ६२२

मावळ ७१ हजार ८९७

ठाणे ६४ हजार ६१५

शिरूर ६४ हजार ३९६

पुणे ५१ हजार ०६४

Story img Loader