निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्रावरून राज्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “गेल्या ३० दिवसांमध्ये महाराष्ट्रात अशा उलथापालथी होत आहेत, रोज इतके नवनवे खुलासे होत आहेत की त्यांचा ट्रॅक ठेवणं देखील कठीण जात आहे. एक तर स्पष्ट झालं की ही महाविकास आघाडी नसून महावसूली आघाडी आहे. यांचा किमान समान कार्यक्रम म्हणजे पोलिसांकरवी पैसा गोळा करा, लुटा हाच यांचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे. महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली आहेत”, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे.

“दोन वर्षांपूर्वी वाझेला सेवेत घेतलं. फडणवीस म्हणाले ठाकरेंचा आग्रह होता म्हणून परमबीर सिंग यांनी त्यांना पुन्हा सेवेत घेतलं. जगात सगळं पाहिलं असेल, पण पोलीसच बॉम्ब ठेवतात हे कुणी पाहिलं नसेल. हेही मुंबईने पाहिलं. पोलीसच ज्याची गाडी चोरी झाली ती घेऊन जातात आणि त्यातच बॉम्ब ठेवतात. त्यानंतर ज्याची गाडी असते त्याची हत्या होते. हत्या कोणत्या हेतूने झाली हे तर आता समोर येईलच. नंतर मध्येच परमबीर सिंग यांचं पत्र येतं. एका न्यायाधीशांची समिती स्थापन होते. रश्मी शुक्लांचा अहवाल येतो. मग सीबीआयची चौकशी सुरू होते. अनिल देशमुखांचा राजीनामा येतो. एनआयएचा तपास सुरूच आहे. वाझेच्या गाड्या आणि पराक्रमातून रोज नवनवे खुलासे होतात. आणि आता वाझेचं पत्र आलंय”, असं प्रकाश जावडेकर यावेळी म्हणाले.

चंद्रकांत पाटलांनी NIA कोठडीत घेतली सचिन वाझेंची भेट?; उत्तर देत म्हणाले…

“वाझेचं पत्र येताच उद्धव ठाकरे शांत झाले…”

सचिन वाझे यांच्या प्रकरणावरून प्रकाश जावडेकरांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “राज्याचे मुख्यमंत्री ११ मार्चला सांगतात की सचिन वाझे ओसामा बिन लादेन नाही. त्याला प्रमाणपत्र देतात. वाझेला अटक झाल्यानंतर १४ मार्चला संजय राऊत म्हणतात एका सक्षम तपास अधिकाऱ्याला त्रास दिला जातोय. शेवटपर्यंत सचिन वाझेचं समर्थन करत होते. सचिन वाझे सत्य बोलेल की काय, यासाठी त्याचं समर्थन सुरू होतं. आता सचिन वाझेचं पत्र आलंय. पत्रात तर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी वाझेंना पैसे वसूल करायला सांगितलं, पुन्हा सेवेत आल्यानंतर वाझेंना काढलं जाऊ नये यासाठी २ कोटी मागितले. अनिल परब यांनी देखील भेडी बाजार पुनर्वसन योजनेतून ५० कोटींच्या वसुली करण्याची मागणी केली. पालिकेच्या कंत्राटदारांकडून देखील २ कोटींच मागणी केली. ही संपूर्ण लूट सुरू होती. पण जसे अनिल परब यांच्यावर आरोप झाले, तशी संजय राऊत यांची प्रतिक्रिया बदलली, उद्धव ठाकरे शांत झाले. आता वाझे सत्य बोलू लागल्यानंतर त्याच्याविरोधात बोललं जात आहे”, असा आरोप प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

“सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही”

राज्यात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचं प्रकाश जावडेकर म्हणाले आहेत. “जर तुम्ही या लुटीसाठी सत्तेत आला आहात, तर जनतेला देखील आपली ताकद दाखवावी लागेल. ही आघाडी निवडून आलेली नाही. भाजपा आणि शिवसेनेची आघाडी निवडून आली आहे. शिवसेनेचे सर्व उमेदवार मोदींचा फोटो लावून जिंकून आले आहेत. या आघाडीचं चरित्र या सगळ्या प्रकरणांमधून समोर आलं आहे. त्यामुळे मी मागणी करतो की महाराष्ट्र सरकारला सत्तेत राहण्याचा अजिबात अधिकार नाही. त्यांनी त्वरीत राजीनामा द्यायला हवा”, अशी मागणी प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.

सचिन वाझेंच्या पत्रावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Story img Loader