उत्तरप्रदेश काँग्रेसचे नेत्याने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. स्मृती इराणी आपल्या अमेठी मतदारसंघात फक्त ‘लटके झटके’ दाखवण्यासाठी येतात, असं वक्तव्य काँग्रेस नेते अजय रॉय यांनी केलं आहे. तसेच, २०२४ च्या लोकसभेला राहुल गांधी अमेठीतून लढणार असल्याचे संकेत अजय रॉय यांनी दिले होते. अजय रॉय यांनी केलेल्या विधानानंतर स्मृती इराणी यांनी पलटवार करत काँग्रेस नेते राहुल गांधींना आव्हान दिलं आहे.
यासंदर्भात स्मृती इराणी यांनी ट्वीट केलं आहे. त्या म्हणाल्या, “राहुल गांधी यांनी एका प्रांतीय नेत्याकडून अभद्र प्रकारे २०२४ साली अमेठीतून निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं, असं ऐकलं आहे. तर तुम्ही अमेठीतून लढणार हे निश्चित समजू का? दुसऱ्या जागेवर तर पळून नाही ना जाणार? किंवा घाबरणार नाही ना? तुम्हाला आणि तुमच्या मम्मीजींना तुमच्या गुंडांसाठी एक नवीन भाषण लिहणारा मिळायला हवा,” असा टोलाही स्मृती इराणी यांनी लगावला.
हेही वाचा : ‘मारहाण’ केल्याची भाषा जवानांची अवहेलना; राहुल गांधींच्या टीकेला परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रत्युत्तर
हेही वाचा : “गाईचे दूध कोणीही काढू शकतो, पण आम्ही बैलाचं…”, गुजरात निवडणुकीच्या निकालावरून केजरीवालांची फटकेबाजी
अजय रॉय काय म्हणाले होते?
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजय रॉय यांनी स्मृती इराणींवर टीका केली होती. “अमेठीतील बहुतांश कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जगदीशपूर औद्योगिक क्षेत्रातील निम्म्याच्यावरती कारखाने बंद पडले आहेत. स्मृती इराणी फक्त येतात आमि ‘लटके झटके’ दाखवून निघून जातात. अमेठी हा गांधींचा बालेकिल्ला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना अमेठीतून लढण्यास सांगू,” असे रॉय यांनी म्हटलं होतं.
“काँग्रेसकडून सातत्याने महिलांच्या…”
अजय रॉय यांच्या वक्तव्यानंतर भाजपाने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उत्तरप्रदेश भाजपाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी रॉय यांचं विधान ‘लाजिरवाणं’ असल्याचं सांगितलं. “देशाला पहिली महिला पंतप्रधान देणाऱ्या पक्षाच्या नेत्याचं वक्तव्य लाजिरवाणं आहे. काँग्रेसकडून सातत्याने महिलांच्या विरोधात भाषा वापरण्यात येते,” असा आरोपही दुबे यांनी केला.