पीटीआय, श्रीहरिकोटा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) सोमवारी नवीन वर्षांचे स्वागत पहिल्या ‘एक्स-रे पोलरिमीटर उपग्रहा’च्या (एक्सपोसॅट) प्रक्षेपणाने करणार आहे. त्यासाठी संबंधित सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. या मोहिमेद्वारे कृष्णविवरांसारख्या (ब्लॅक होल) खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ऑक्टोबरमधील गगनयान चाचणी वाहन ‘डी १ मिशन’च्या यशानंतर हे प्रक्षेपण करण्यात येत आहे. या मोहिमेचे आयुष्य सुमारे पाच वर्षांचे असेल. ही भारताची पहिली समर्पित ‘पोलरिमीटर’ मोहीम आहे. त्यामुळे कृष्णविवरांच्या रहस्यमय बाबींचा अभ्यास करण्यास मदत होईल.

ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक (पीएसएलव्ही) -‘सी ५८’ आपल्या साठाव्या मोहिमेत प्रमुख अभ्यास उपग्रह ‘एक्सपोसॅट’सह दहा अन्य उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. हे उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत सोडले जातील. चेन्नईपासून पूर्व भागात सुमारे १३५ किलोमीटरवर असलेल्या अवकाश केंद्रातून नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी होत असलेल्या प्रक्षेपणासाठी २५ तासांची उलटगणती सुरू झाली आहे. 

हेही वाचा >>>विकसित भारत स्वावलंबनाच्या भावनेने परिपूर्ण; वर्षांच्या अखेरच्या ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांकडून विश्वास व्यक्त

‘इस्रो’च्या मते, अवकाश आधारित ध्रुवीकरण मापनांद्वारे खगोलीय स्त्रोतांकडून क्ष किरण उत्सर्जनाचा अभ्यास करणारा हा ‘इस्रो’चा पहिला समर्पित वैज्ञानिक अभ्यास उपग्रह आहे. ‘इस्रो’व्यतिरिक्त, अमेरिकन संस्था ‘नासा’ने डिसेंबर २०२१ मध्ये ‘सुपरनोव्हा’ स्फोटाचे अवशेष, कृष्णविवरांमधून उत्सर्जित होणाऱ्या कणांचे प्रवाह आणि इतर खगोलीय घटनांवर असाच अभ्यास केला होता.

मोहिमेची वैशिष्टय़े

’ कृष्णविवरांसारख्या (ब्लॅक होल) खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न

’ उपग्रह प्रक्षेपक प्रमुख अभ्यास उपग्रह ‘एक्सपोसॅट’सह दहा अन्य उपग्रह प्रक्षेपित करणार

’ खगोलीय स्त्रोतांकडून होणाऱ्या क्ष किरण उत्सर्जनाचा अभ्यास करणारा हा ‘इस्रो’चा पहिला समर्पित वैज्ञानिक अभ्यास उपग्रह

श्रीहरिकोटा येथे इस्रोच्या एक्स-रे पोलरीमीटर उपग्रह (एक्स-पीओसॅट) वाहून नेणाऱ्या पीएसएलव्ही-सी५८ या प्रक्षेपकाच्या उड्डाणाची तयारी सुरू आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Launch of exposat satellite today amy