भारतीय बनावटीच्या जीएसएलव्ही डी-५ या प्रक्षेपकाचे (भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक) उड्डाण तांत्रिक कारणामुळे सोमवारी दुपारी रद्द करण्यात आले. इंधन गळती होत असल्याचे लक्षात आल्यावर सुरुवातीला उलट गणती थांबविण्यात आली आणि नंतर उड्डाण रद्द करण्यात आले, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हटले आहे. 
तीन वर्षांच्या खंडानंतर हा प्रक्षेपक पुन्हा एकदा उड्डाणासाठी सज्ज झाला होता आणि त्याची २९ तासांची उलट गणती रविवारी सुरू झाली होती. जीसॅट १४ हा उपग्रह या प्रक्षेपकाच्या मदतीने सोडला जाणार होता. या प्रक्षेपकाच्या उड्डाणाची नवी तारीख नंतर जाहीर केली जाईल, असे सांगण्यात आले.
१९८२ किलो वजनाचा उपग्रह घेऊन जीएसएलव्ही डी-५ प्रक्षेपक भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या श्रीहरीकोटा (आंध्र प्रदेश) येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून सोमवारी दुपारी साडेचार वाजता अवकाशात झेपावणार होता. मात्र, त्याआधीच प्रक्षेपकामध्ये काहीतरी बिघाड झाल्याचे लक्षात आल्यामुळे उलट गणती स्थगित करण्यात आली. यापूर्वी जीएसएलव्ही डी ३ या प्रक्षेपकाचे उड्डाण १५ एप्रिल २०१० रोजी करण्यात आले होते व ते फसले होते. त्यानंतर रशियन क्रायोजेनिक इंजिन वापरून केलेले उड्डाणही डिसेंबर २०१० मध्ये फसले होते.

Story img Loader