पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांतील हिंसक घडामोडी पाहता ८०च्या दशकातील घटनांची आठवण पुन्हा ताजी होते. अर्थात आजच्या परिस्थितीची तुलना लगेच त्यावेळच्या परिस्थितीशी करता येणार नाही. ७ ते १३ ऑक्टोबरदरम्यान राज्यात सुरू झालेले शेतकऱ्यांचे रेल-रोको आंदोलन राज्यातील अकाली दल-भाजप सरकारने गांभीर्याने घेतले नाही . राजकीय हेतूने हे आंदोलन प्रेरित असल्याची हेटाळणी त्यांनी केली. त्यानंतर हे आंदोलन चिघळत असतानाच, शिखांचा पवित्र धर्मग्रंथ गुरू ग्रंथ साहिबच्या विटंबनेवरून आता राज्यात आगडोंब उसळला आहे. याबाबतच्या काही घटना राज्यात घडल्या. याप्रकरणी दोन भावांसह सात जणांना अटकही करण्यात आली आहे. त्यामुळे गेले नऊ दिवस राज्य धुमसत असून, राज्य सरकारला परिस्थिती आटोक्यात आणणे जमलेले नाही. राज्यात अशांतता निर्माण करण्याचा दुबई व ऑस्ट्रेलियात शिजल्याचे पोलिसांनी उघड केल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे. राज्याला पुन्हा ‘ते दिवस’ दाखवण्याचे काही मंडळींचे कारस्थान असल्याचा आरोप मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी केला आहे. विशेष म्हणजे २०१७ मध्ये पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे राजकीय फायद्या-तोटय़ाचे गणित पाहिले जात आहे. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. त्यात दोघांचा मृत्यू झाल्यानंतर सत्तारूढ अकाली दलात नाराजी आहे. पंजाब लोकसेवा आयोगाचे मोहनलाल बंगा यांनी राजीनामा दिला आहे. दोन धर्मगुरू व काही कडव्या गटांनी हे आंदोलन हातात घेतल्याने वातावरण चिघळले आहे. विशेष म्हणजे ठिकठिकाणी रास्ता रोकोमुळे सत्तारूढ कार्यकर्त्यांना ग्रामीण भागात जनतेशी संवाद साधणेही कठीण झाले आहे. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमित राम रहिम यांना ईश्वरनिंदेच्या आरोपावरून अकाल तख्तने माफी दिल्याने तणाव आणखी वाढल्याचा आरोप केला जात आहे. त्याचे खापर अकाली दलावर फोडले जात आहे. जालंधरमध्ये सीमा सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. यावरून राज्यातील पोलीस दलावर विश्वास नसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रतापसिंग बाजवा यांनी केला आहे. आम आदमी पक्षाने तर याआडून लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका केली आहे.

 

‘राज्यात अशांततेचा कट’
पंजाबात अशांतता निर्माण करण्याचा कट राज्यातील अकाली दल-भाजप सरकार उधळून लावेल, असे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी स्पष्ट केले. मोठी किंमत मोजून राज्यात शांतता निर्माण केली आहे. मात्र देशातून तसेच देशाबाहेरील काही शक्ती अशांतता निर्माण करू पाहात असल्याचा आरोप बादल यांनी आनंदपूर साहिब येथे बोलताना केला.