इटलीच्या संसेदतील काही खासदारांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. इटलीत सध्या जी-७ शिखर परिषद सुरू आहे. त्यामुळे जगभरातील मोठ्या देशाचे प्रमुख इटली दाखल झाले आहेत. अशावेळी हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने विविध चर्चांनाही उधाण आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, इटलीतील काही प्रदेशांना अधिक स्वायत्तता देण्याच्या मुद्द्यावरून इटलीच्या संसदेत राडा झाला आहे. या प्रदेशांना अशाप्रकारे स्वायत्तता दिल्यास उत्तर- दक्षिण अशी प्रादेशिक दरी निर्माण होईल आणि दक्षिणी प्रदेशांतील गरिबीत वाढ होईल, असा दावा इटलीच्या संसदेतील विरोधीपक्षांनी केला आहे.
दरम्यान, इटलीच्या सरकारने संसदेत यासंदर्भात प्रस्ताव मांडल्यानंतर विरोधी पक्षनेते लियोनार्डो डोनो यांनी मंत्री रॉबर्टो कैल्डेरोली इटली झेंडा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, रॉबर्टो कैल्डेरोली तो स्वीकारण्यास नकार दिला. त्यावेळी अचानक विरोधी पक्षातील सदस्यांनी रॉबर्टो कैल्डेरोली यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेच सत्ताधारी पक्षातील काही सदस्यही त्याठिकाणी दाखल आले. त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
हेही वाचा – अजित डोवाल तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी; भारत सरकारकडून नियुक्तीपत्र जाहीर
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. या घटनेबाबत खेद व्यक्त करत ते म्हणाले, की माझ्याकडे बोलायला शब्द नाही. महत्त्वाचे म्हणजे ही घटना अशावेळी घडली, जेव्हा जी-७ परिषदेसाठी जो बायडनपासून तर नरेंद्र मोदींपर्यंत जगभरातील मोठ्या देशांचे प्रमुख इटलीत दाखल झाले आहेत. त्यामुळे जागतिक पातळीवर विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.