Lawrence Bishnoi Brother Anmol Bishnoi: कुख्यात गँगस्टर व बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातमधील तुरुंगात आहे. पण असं असलं तरी बिश्नोई गँगच्या कामात कोणताही फरक पडलेला नाही. कारण त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई बाहेर गँगचं पूर्ण काम पाहात असल्याचं समोर आलं आहे. अनमोल बिश्नोई भारतात नसून विदेशातून तो गँगच्या सर्व कारवायांचं नियोजन करून त्यासंदर्भात संबंधितांना आदेश देत आहे. काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या व त्यानंतर सलमान खानला धमकी देण्यातही अनमोल बिश्नोईचाच हात असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर वाँटेड गुन्हेगार अनमोल बिश्नोईचा ठावठिकाणा मुंबई पोलिसांना लागला आहे. या तपास प्रक्रियेचं हे मोठं यश असल्याचं मानलं जात आहे.

लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात असतानाही गँगच्या कारवाया कशा पार पाडल्या जात आहेत? याबाबत पोलिसांनी केलेल्या तपासात अनमोल बिश्नोईचं नाव समोर आलं. त्यानंतर त्याचा शोध सुरू झाला. अनमोल बिश्नोईवर आत्तापर्यंत १९ गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांनी त्याचा समावेश वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत केला आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण व सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यामागेही अनमोल बिश्नोईच असल्याचा कयास आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस त्याचा कसून शोध घेत असतानाच तो कुठे लपून सगळ्या कारवाया करत आहे, याचा सुगावा पोलिसांना लागला आहे.

lawrence bishnoi interview
लॉरेन्स बिश्नोईची तुरुंगात झालेली मुलाखत चर्चेत! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अमेरिकेनं दिली माहिती, मुंबई पोलिसांचं मोठं पाऊल!

अवघ्या २५ वर्षांच्या अनमोल बिश्नोईचा ठावठिकाणा अमेरिकन प्रशासनानं मुंबई पोलिसांना दिल्याचं समोर आलं आहे. १६ ऑक्टोबरला मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या विनंतीनुसार, अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाची मागणी करण्यात आली आहे. एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे. अनमोल बिश्नोई अमेरिकेतच असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली असून त्यानुसार त्यांनी त्याच्या प्रत्यार्पणासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

अनमोल बिश्नोईविरोधात रेड कॉर्नर नोटीस

१६ ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांनी अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणासाठीचा अर्ज न्यायालयासमोर सादर केला आहे. गेल्याच आठवड्यात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA नं अनमोल बिश्नोईवर १० लाखांचं बक्षीसदेखील जाहीर केलं आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येसाठी सर्व मदत केल्याचाही आरोप अनमोल बिश्नोईवर आहे. अनमोल बिश्नोईविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती तपास संस्थेच्या आरोपपत्रात देण्यात आली आहे. रेड कॉर्नर नोटीसच्या आधारावरच अमेरिकेतली तपास यंत्रणांकडून मुंबई पोलिसांना संपर्क साधण्यात आला होता.

Lawrence Bishnoi: पोलीस स्टेशन नव्हे, लॉरेन्स बिश्नोईचा स्टुडिओ? उच्च न्यायालयानं पोलिसांना घेतलं फैलावर!

पोलिसांना न्यायालयाने प्रत्यार्पणाची परवानगी दिली असून त्यासंदर्भातील आवश्यक ती कागदपत्रे केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवण्यात आली आहेत. आता गृहमंत्रालयाकडून अमेरिकेतली संबंधित यंत्रणांशी याबाबत संपर्क साधला जाईल, अशीही माहिती देण्यात आली आहे.

Story img Loader