Killer Of Shraddha Walkar On Hitlist of Lawrence Bishnoi Gang: गेल्या महिन्यात माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणारा मुख्य आरोपी शिवकुमार गौतम उर्फ शिवा याला मुंबई पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या आरोपीची चौकशी करताना त्याने पोलिसांसमोर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी अफताब पुनावाला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर आहे. अफताब पुनावालाने मे २०२२ मध्ये त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केल्याचा आरोप आहे.
ही माहिती समोर आल्यानंतर तिहार कारागृह प्रशासनाने अफताब पुनावालाची सुरक्षा वाढवली आहे. असे असले तरी तिहार कारागृहाच्या प्रशासनाला मुंबई पोलिसांकडून आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
मे २०२२ मध्ये, आफताब पुनावाला याने दिल्लीत २७ वर्षीय श्रद्धा वालकरचा गळा आवळून खून करत, तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते. श्रद्धाने लग्नासाठी दबाव टाकल्यानंतर आरोपीने हा गुन्हा केल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण घटनेने देशभरात खळबळ उडाली होती.
मुनव्वर फारूकी
बाबा सिद्दीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेल्या शिवकुमार उर्फ शिवाने पोलिसांना सांगितले की, “सिद्दीकी यांना मारण्यासाठी उशीर होत असल्याने या प्रकरणातील फरार आरोपी शुभम लोणकरने नाराजी व्यक्त केली होती.” तो म्हणाला होता की, “सिद्दीकी यांच्या आधी मी नेमलेले मारेकरी मुनव्वर फारूकीचा खात्मा करतील.”
कॉमेडियन मुनव्वर फारूकीने हिंदू देवतांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे लॉरेन्स बिश्नोई टोळी संतापली होती. त्यामुळे त्यांनी सप्टेंबरमध्ये फारूकीची हत्या करण्याची योजना आखली होती. यासाठी त्यांनी दिल्लीतील एका हॉटेलची तपासणीही केली होती, जिथे मुनव्वर फारूकीचा कार्यक्रम होणार होता. मात्र, गुप्तचर यंत्रणेला या कटाची माहिती मिळाल्याने त्यांनी हा कट हाणून पाडला होता. त्यानंतर बिश्नोई टोळीचा फारूकीला असलेला धोका लक्षात घेऊन पोलिसांनी त्याची सुरक्षा वाढवली होती.
आणखी पाहा: ‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
सलमान खानसह सिद्धू मुसेवालाचा व्यवस्थापकही रडारवर
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध कारणांसाठी बिश्नोई टोळीने अनेकांना लक्ष्य केले आहे. त्यांच्या प्रमुख्य लक्ष्यांपैकी अभिनेता सलमान खान एक आहे. सलमान खानने १९९८ काळवीटाची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यामुळे बिश्नोई टोळी याचा बदला घेण्याचा प्रयत्न करत आहे. बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर असलेल्या इतरांमध्ये सिद्धू मुसेवालाचा व्यवस्थापक शगनप्रीत सिंग, सध्या गुरुग्राम कारागृहात असलेला गुंड कौशल चौधरी आणि प्रतिस्पर्धी अमित डागर यांच्याही समावेश आहे.