गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने अभिनेता सलमान खानला धमकी दिली होती. बिश्नोई टोळीने सलमान खानची हत्या करण्यासाठी प्लॅनही तयार केला होता. आता पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला उघड उघड धमकी दिली आहे. सलमान खानचा अहंकार मोडणार, असा इशारा लॉरेन्स बिश्नोईने दिला आहे.
‘एबीपी न्यूज’च्या ‘ऑपरेशन दुर्दांत’ अंतर्गत लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीत त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. तसेच, सलमान खानला धमकीची चिठ्ठी लिहली होती का? याबद्दलही बिश्नोईने खुलासा केला आहे.
हेही वाचा : सिद्धू मूसेवालाची हत्या का केली? कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने स्वत:च केला खुलासा
लॉरेन्स बिश्नोईने सांगितलं, “माझ्या समाजातील लोकांचा सलमान खानवर खूप राग आहे. त्याने कायम आमच्या समाजाला तुच्छ लेखलं. त्याच्यावर केस चालू आहे. पण, अद्यापही माफी मागितली नाही. आमच्या परिसरात प्राण्याचा जीव घेतला जात नाही. झाडं कापण्यास बंदी आहे. मात्र, जिथे बिश्नोई समाजाची संख्या जास्त आहे, तिथे येत सलमान खानने हरीणाची शिकार केली आहे.”
“माझा सलमान खानवर लहानपासून राग आहे. कधी ना कधी सलमान खानचा अहंकार मोडणार आहे. त्याने आमच्या देवाच्या मंदिरात येऊन माफी मागितली पाहिजे. सलमान खानने बिश्नोई समाजातील लोकांना पैशांचं आमिष दाखवलं होतं. परंतु, सलमान खानला प्रसिद्धीसाठी नाहीतर हेतूच्या उद्देशाने मारणार आहोत,” असे बिश्नोईने म्हटलं.
हेही वाचा : ‘Meta’ मध्ये दुसऱ्यांदा होणार तब्बल १० हजार कर्मचाऱ्यांची कपात; CEO म्हणाले, “आपल्या सर्वांना…”
सलमान खानला धमकीची चिठ्ठी लिहली होती का? असं विचारलं असता बिश्नोई म्हणाला, “मी कोणतीही धमकीची चिठ्ठी लिहली नाही. सलमानला आम्ही ठोस उत्तर देणार आहे. पण, बिश्नोई समाजाने सलमान खानला माफ केलं, तर आमचं काही देणं-घेणं नाही,” असेही बिश्नोईने स्पष्ट केलं.