काँग्रेस नेता आणि गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई सध्या तुरुंगात आहे. त्याची एनआयएकडून चौकशी सुरू असून या चौकशीदरम्यान बिश्नोईने मोठा खुलासा केला आहे. लॉरेन्सने सांगितलं की, अनेक नेते, व्यावसायिक त्याला धमकी देणारे कॉल करण्यासाठी स्वतःच पैसे देतात. जेणेकरून त्यांना पोलीस संरक्षण मिळेल. लॉरेन्स बिश्नोईला खलिस्तानी संघटनांकडून झालेल्या फंडिंगप्रकरणी एनआयएकडून त्याची चौकशी सुरू असताना बिश्नोईने ही माहिती दिली. द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खलिस्तान समर्थक संघटनांकडून झालेल्या फंडिंगबाबत लॉरेन्सची चौकशी केल्यावर तो म्हणाला, मी खलिस्तान समर्थकांच्या विरोधात आहे. मला केवळ या गुन्हेगारांबरोबर माझा व्यापार करायचा आहे. मी खलिस्तानचं समर्थन करत नाही. त्याचबरोबर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबरोबरच्या संबंधांबद्दल विचारल्यावर लॉरेन्स म्हणाला, मी डी-कंपनी आणि दाऊद इब्राहिमच्या देखील विरोधात आहे. येत्या काळात मी अशा गँगस्टर्सबरोबर काम करणार होतो जे दाऊदच्या विरोधात आहेत.

एनआयएमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिश्नोईने तपास अधिकाऱ्यांना सांगितलं की, तो मद्य विक्रेते, कॉल सेंटर्सचे मालक, अंमली पदार्थांची तस्करी करणआरे तसेच बांधकाम व्यावसायिकांकडून दर महिन्याला २.५ कोटी रुपयांची खंडणी वसूल करत होता. तसेच त्याने सांगितलं की, अलिकडच्या काळात त्याला अनेक नेत्यांनी, व्यावसायिकांनी धमकी देणारे कॉल करण्यासाठी पैस दिले आहेत. जेणेकरून त्यांना पोलीस सुरक्षा मिळेल. बिश्नोई म्हणाला, पोलीस सुरक्षा मिळवण्यासाठी हे लोक मला पैसे देऊन धमकी देणारे कॉल करायला सांगतात.

हे ही वाचा >> “शरद पवारांच्या मुलीचं भलं…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल, म्हणाले, “राष्ट्रवादीचा ७०,००० कोटींचा घोटाळा…”

“गोल्डी ब्रार आणि मी १३ वर्षांपूर्वी पंजाब विद्यापीठात भेटलो”

बिश्नोईने सतींदर सिंग उर्फ ​​गोल्डी ब्रार याच्याबरोबर मिळून अनेक गुन्हेगारी कारवाया केल्या आहेत. दोघांबद्दलच्या संबंधांबद्दल चौकशी केल्यावर लॉरेन्स म्हणाला, आम्ही २०१० मध्ये पहिल्यांदा पंजाब विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये भेटलो होतो. ब्रार तिथे बीए करत होता आणि कबड्डी खेळायचा. मीसुद्धा खेळांमध्ये सहभागी व्हायचो, त्यामुळे आम्ही मैदानावर भेटायचो. काही महिन्यांनी आमची घनिष्ठ मैत्री झाली. गोल्डी ब्रारचे वडील पोलीस अधिकारी होते. परंतु कुठेतरी त्याचं मोठं भांडण झालं म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला कॅनडाला पाठवलं. ब्रारचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून तो ७० ट्रक चालवतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lawrence bishnoi says i am against dawood ibrahim and d company asc