गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई सध्या पंजाबमधल्या बठिंडा येथील तुरुंगात आहे. त्याची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान बिश्नोईने मोठा खुलासा केला आहे. लॉरेन्सने सांगितलं की, बरेच नेते, व्यावसायिक तसेच इतर धनाढ्य लोक त्याला धमकी देणारे कॉल करण्यासाठी स्वतःच पैसे देतात. जेणेकरून त्यांना त्या धमकीच्या कॉलनंतर पोलीस सुरक्षा मिळेल. बिश्नोई गँगला खलिस्तानी संघटनांकडून झालेल्या फंडिंगप्रकरणी एनआयएकडून त्याची चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान त्याने अनेक खुलासे केले आहेत.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला देखील बिश्नोई गँगने अलिकडेच जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. याविषयी चौकशीदरम्यान, लॉरेन्स बिश्नोई म्हणाला, १९९८ मध्ये सलमान खानचं नाव काळवीट शिकार प्रकरणात पुढे आलं तेव्हापासून तो माझ्या रडारवर आहे. खरंतर बिश्नोई समाजात हरीण-काळवीट या प्राण्यांना खूप पवित्र मानलं जातं. बिश्नोई म्हणाला जर सलमानने माफी मागितली तर आम्ही त्याला माफ करू.
हे ही वाचा >> अमेरिकेत मोदींना भारतातील अल्पसंख्याकांबाबत प्रश्न विचारणारी महिला पत्रकार ट्रोल, व्हाईट हाऊसने नोंदवला निषेध, म्हणाले…
दोन महिन्यांपूर्वी ‘एबीपी न्यूज’ने ‘ऑपरेशन दुर्दांत’अंतर्गत लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत देखील बिश्नोई सलमान खान धमकी प्रकरणावर बोलला होता. बिश्नोई म्हणाला होता की, “माझ्या समाजातील लोकांचा सलमान खानवर खूप राग आहे. त्याने कायम आमच्या समाजाला तुच्छ लेखलं आहे. त्याच्यावरील खटला अद्याप सुरू आहे. परंतु, त्याने अद्याप माफी मागितली नाही. आमच्या परिसरात प्राण्याचा जीव घेतला जात नाही. झाडं कापण्यास बंदी आहे. तरीदेखील जिथे बिश्नोई समाजाची संख्या जास्त आहे, तिथेच येऊन सलमान खानने काळवीटाची शिकार केली.”