Lawrence Bishnoi Munawar Faruqui: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या झाल्याने मुंबईत खळबळ उडाली. याचे पडसाद राष्ट्रीय स्तरावरही उमटले. लॉरेन्स बिश्नोई गँगनं या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचं नंतर स्पष्ट झालं. मात्र, आता स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकी हादेखील बिश्नोई गँगच्या हिट लिस्टवर होता, अशी माहिती समोर आली आहे. शिवाय त्याच्या हत्येचा कट इंग्लंडमध्ये रचण्यात आल्याची धक्कादायक बाब तपास यंत्रणांच्या समोर उघड झाली आहे.
लॉरेन्स बिश्नोई गुजरातमधील तुरुंगात असला, तरी त्याचे काही सहकारी विदेशात राहून गँगचा कारभार चालवत आहेत. यात त्याचा भाऊ व मित्र गोल्डी ब्रार यांचाही समावेश आहे. पण त्याचबरोबर आता यूकेमध्ये असणारा रोहित गोदार यानं बिश्नोई गँगसाठी मुनव्वर फारूकीला जीवे मारण्याचा कट रचल्याचं आता तपासात निष्पन्न झालं आहे. रोहित गोदारनं दिल्लीतील दोन मारेकऱ्यांना फारूकीला मारण्याची सुपारी दिली होती. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.
भलत्याच प्रकरणात झाला खुलासा!
वास्तविक बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण किंवा बिश्नोई गँगच्या इतर कोणत्याही प्रकरणाच्या तपासातून ही बाब समोर आलेली नाही. १३ सप्टेंबर रोजी ग्रेटर कैलाश परिसरात एका अफगाणी व्यक्तीची हत्या झाल्याच्या प्रकरणाचा पोलीस तपास करत होते. यामध्ये स्पेशल टास्क फोर्सनं हरियाणातून मारेकऱ्याला अटक केली. पण त्याच्या चौकशीमध्ये पोलिसांच्या हाती घबाडच लागलं. रोहित गोदारनं मुनव्वर फारूकीच्या हत्येची सुपारी दिलेल्या दोन मारेकऱ्यांपैकीच तो एक होता! या मारेकऱ्याच्या चौकशीमध्ये त्यानं मुनव्वर फारूकीच्या हत्येची सुपारी आपल्याला मिळाल्याचं कबूल केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफागाणिस्तानचा नादिर शाह याची गेल्या महिन्यात हत्या झाल्यानंतर पोलिसांनी १० जणांना अटक केली. त्यांच्या तपासातून या हत्येमागे बिश्नोई गँगच असल्याचं तपासातून समोर आलं. या आरोपींची चौकशी करताना पोलिसांना समजलं की त्यांनी इथल्या न्यू फ्रेंड्स कॉलनीमधील एका नामांकित हॉटेलची रेकी केली होती, पण त्यावेळी त्यांना टार्गेट कोण आहे हे माहिती नव्हतं. ही माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून दिल्ली पोलिसांना देण्यात आली होती. त्यात बिश्नोई गँगच्या हिट लिस्टवर एक मुस्लीम स्टँडअप कॉमेडियन असल्याचंही नमूद होतं.
मुनव्वर फारूकीचीच सुपारी दिल्याचं सिद्ध झालं!
दरम्यान, नादिर शाह हत्या प्रकरणाचा तपास करणार दिल्ली पोलिसांचं पथक न्यू फ्रेंड्स कॉलनीमधील त्या हॉटेलमध्ये चौकशीसाठी गेलं. त्यावेळी हॉटेलच्या पाहुण्यांच्या यादीमध्ये मुनव्वर फारूकीचंही नाव होतं! त्यावेळी फारूकी दिल्लीमध्ये एंटरटेनर्स क्रिकेट लीगमध्ये खेळण्यासाठी येणार होता. त्यानंतर पोलिसांचं पथक तातडीने दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. तिथे त्यांची मुनव्वर फारूकीशी भेट झाली. त्याला पोलिसांनी परिस्थिती समजावून सांगितली. तिथून फारूकी तातडीने मुंबईसाठी रवाना झाला. तसेच, दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांनाही फारूकीला सुरक्षा पुरवण्याची विनंती केली.
मुनव्वर फारुकी लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टवर का आहे?
जवळच्याच हॉटेलमध्ये मारेकरीही होते!
दरम्यान, पोलिसांनी जवळच्याच नेहरू प्लेसमधील एका हॉटेलचं रजिस्टर तपासल्यानंतर नुकतेच जामिनावर सुटून तुरुंगाबाहेर आलेले दोन कैदी तिथे राहात असल्याचं पोलिसांना समजलं. त्यामुळे मुनव्वर फारूकी बिश्नोई गँगच्या हिट लिस्टवर असल्याची पोलिसांची खात्री पटली. यासंदर्भात अटक करण्यात आलेल्या आरोपीनं गोदाराकडून आलेल्या फोन कॉलसंदर्भात माहिती दिली. गोदाराकडून आपल्याला फोन आला व त्यावर फारूकीची हत्या करण्याची सुपारी दिली. त्यानुसार त्यांनी मुंबई व दिल्लीमध्ये रेकी केल्याचा दावा आरोपीनं केल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
मुनव्वर फारूकीच्या जीविताला धोका असल्याची कोणतीही तक्रार वा गुन्हा अद्याप दाखल झालेला नसल्यामुळे संबंधित आरोपींना फारूकीच्या सुपारीबाबत माहिती दिल्यानंतरही त्यांची अटक ही नादीर शाह हत्या प्रकरणातच झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.