Lawrence Bishnoi Why this Gangster wants to Kill Bollywood Actor Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याला येणाऱ्या धमक्यांमुळे अधिक चर्चेत आहे. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्णोईच्या टोळीने सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या टोळीने सलमानसह मुंबईतील व्यावसायिक, बॉलिवूड कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी सलमानच्या घराबाहेर गोळीबार घडवून आणला होता. अशातच दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते झियाउद्दिन अब्दुल रहीम सिद्दीकी उर्फ बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. बिश्णोई टोळीनेच या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. सिद्दीकी हे सलमानचे निकटवर्तीय मानले जात होते. सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी स्वीारताना बिश्णोई टोळीने सलमान खानचा देखील उल्लेख केला आहे. त्यामुळे सलमान खान सध्या भितीदायक वातावरणात आहे.

मुंबई पोलिसांनी सलमान खानची सुरक्षा व्यवस्था वाढवली असली तरी सलमानच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. मात्र, अनेकांना प्रश्न पडला आहे की सलमान खान या कुख्यात गुंडाच्या निशाण्यावर का आहे? गेल्या अनेक वर्षांपासून सलमान बिश्णोई टोळी आणि बिश्णोई समाजाच्या रोषाचा सामना करत आहे. १९९८ मध्ये सलमान खान त्याचा चित्रपट ‘हम साथ साथ हैं’चं राजस्थानमध्ये चित्रीकरण करत होता. त्यावेळी सलमान खानला चित्रपटाच्या सेटवरून अटक करण्यात आली होती. कारण सलमान खानने तिथे हरणाची शिकार केल्याचा त्याच्यावर आरोप होता. याप्रकरणी सलमानला तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. त्यानंतर तो जामीनावर सुटला.

हे ही वाचा >> Lawrence Bishnoi : सलमान खानप्रमाणे ‘हे’ १० जण बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर, NIA समोर लॉरेन्सनेच दिलेली कबुली

५ एप्रिल २०१८ रोजी सलमान खानला हरणाची शिकार केल्याप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. दोन दिवसांनी त्याला जोधपूर मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आलं. दोन दिवसांनंतर त्याला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आणि तो तुरुंगातून बाहेर आला. न्यायालयात तब्बल २६ वर्षे हा खटला चालला. हरणाच्या शिकार प्रकरणात सलमान खानला अलीकडेच न्यायालयाने निर्दोष सोडल्यानंतर बिश्णोई टोळीने सलमानला धमकी दिली होती. तसेच हरणांची पूजा करणारा बिश्णोई समाजही सलमानवर संतापला.

अन् या प्रकरणात बिश्णोई टोळीची एंट्री झाली

काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला मुक्त केल्यानंतर बिश्णोई टोळीने सलमानला धमकी दिली होती. “सलमान खानने काळवीट मारलं आहे. त्याला सर्व प्रकरणांमधून दोषमुक्त करण्यात आलंय. त्याने काळवीटाची शिकार करुन खूप मोठी चूक केली आहे. आम्ही उघडपणे सांगतोय की पुढे आम्ही सलमानचा कार्यक्रम करणार. यामध्ये कोणतीच शंका नाही,” असा इशारा बिष्णोईने टोळीचा प्रमुख असणाऱ्या लॉरेन्स विष्णोईचा मानलेला भाऊ राजवीर सोपूने दिला होता. तेव्हापासून ही टोळी सलमानच्या मागे लागली आहे.

हे ही वाचा >> बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; पाकिस्तानी गँगस्टर शाहजाद भट्टीला तुरुंगातून केला होता Video कॉल!

…तेव्हा बिश्णोईने सलमानसमोर माफीचा पर्याय ठेवलेला

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लॉरेन्स बिश्णोईने म्हटलं होतं की त्याचा समाज सलमान खानला माफ करेल. परंतु, त्यासाठी सलमान खानला राजस्थानमधील बीकानेर येथील बिश्णोई समाजाच्या प्रमुख मंदिरात (मुक्तीधाम मुकाम) मंदिरात जाऊन हात जोडून माफी मागावी लागेल. त्यानंतर आम्ही त्याला माफ करण्याचा विचार करू. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये बिश्णोई टोळी व सलमान खानमधील शत्रूत्त्व अधिक वाढलं आहे.