Lawrence Bishnoi have phones in Jial : बिश्नोई टोळीचा प्रमुख असलेला लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातमधील साबरमती मध्यवर्ती कारागृत कैद आहे. दरम्यान लॉरेन्स बिश्नोईकडे कारागृहात मोबाइल फोन असल्याचे त्याच्या जवळच्या सहकाऱ्याने कबुलीजबाबात सांगितले आहे. सप्टेंबरमध्ये दिल्लीतील जिम मालकाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हाशिम बाबाने आपल्या न्यायालयीन कबुलीजबाबात म्हटले आहे की, “मला बिश्नोईचा व्हिडिओ कॉल आला होता, त्यावेळी त्याने दोन सेलफोन दाखवले आणि त्याच्यासाठी कारागृहात “खास सोय” केल्याचा दावा केला.”
१२ डिसेंबर रोजी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने हाशिम बाबाच्या न्यायालयीन कबुलीजबाबाच्या आधारे जिम मालक नादिर शाह यांच्या हत्येप्रकरणी शहर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. एका पथकाने यापूर्वी साबरमती कारागृहाला भेट दिली होती आणि हत्येमागील हेतू शोधण्यासाठी बिश्नोईची चौकशी केली होती परंतु त्याने सहकार्य केले नाही.
नादिर शाह याच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या १४ जणांमध्ये बिश्नोई हा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. बिश्नोईने त्याचा अमेरिकास्थित साथीदार रणदीप मलिककडे शाहच्या हत्येचे सर्व नियोजन दिले होते. त्यानेच अटक केलेल्या शूटर्सच्या खात्यात पैसे हस्तांतरित केल्याचे दिल्ली पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
हाशिम बाबाने ईशान्य दिल्लीच्या मंडोली कारागृहातून न्यायालयीन कबुलीजबाब नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर, १ ऑक्टोबर रोजी त्याचे जबाब नोंदवले गेले. त्याच्या जबाबात त्याने आरोप केला की, ऑगस्ट २०२३ पासून साबरमती तुरुंगात असलेल्या बिश्नोईने शाहला मारण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “हाशिम दिल्लीच्या तिहार कारागृहात असताना २०२१ मध्ये बिश्नोईला पंजाबच्या तुरुंगातून तिहारमध्ये आणण्यात आले. त्यानंतर ते चांगले मित्र झाला. सुमारे सहा-सात महिन्यांनंतर बिश्नोईला पंजाबला आणि त्यानंतर गेल्या वर्षी त्याला साबरमती कारागृहात हलवण्यात आले. सुमारे दोन महिन्यांपूर्वी तो हाशिमशी वारंवार फोनवर बोलू लागला. तेव्हा लॉरेन्सने हाशिमला एका व्हिडिओ कॉलमध्ये त्याचे दोन सेलफोन दाखवले होते. तसेच तुरुंगात त्याच्यासाठी विशेष व्यवस्था असल्याचा दावा केला होता”, असे पोलिसांनी सांगितले.
गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येचा आणि अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घरावर झालेल्या गोळीबाराचा कथित सूत्रधार असलेल्या बिश्नोईवर फोन ठेवण्याचा किंवा कारागृहातून कॉल केल्याचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याचावर अशा प्रकारचे आरोप झाले आहे.