सर्वोच्च न्यायालयात भटक्या कुत्र्यांच्या देशभरातल्या वाढत्या त्रासावर आज सखोल चर्चा झाली. चीफ जस्टिस ऑफ इंडिया अर्थात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या विषयावर चिंता व्यक्त केली. एका वकिलाला कुत्रा चावल्याची जखम त्यांनी पाहिली आणि त्यांनी त्या वकिलाशी चर्चा केली. त्यानंतर चंद्रचूड यांना समजलं की कुत्रा चावल्याने ही जखम त्या वकिलाला झाली आहे. यावरुन एक प्रदीर्घ चर्चाच सर्वोच्च न्यायालयात झाली. कारण या चौकशीमुळे भटक्या कुत्र्यांच्या समस्येची चर्चा ही सर्वोच्च न्यायालयात पोहचली.
नेमकी कशी सुरु झाली चर्चा?
चंद्रचूड यांनी एका वकिलाच्या हाताला झालेली जखम पाहिली तुला हे कसं लागलं हे विचारलं त्यानंतर चर्चा सुरू झाली. तो संवाद असा होता.
चंद्रचूड : तुला नेमकं काय झालं?
वकील: पाच कुत्र्यांनी माझा पाठलाग केला.
चंद्रचूड चकीत झालं आणि विचारलं कुठे घडलं हे आपल्या शेजारी?
वकील: होय.
चंद्रचूड यांनी याविषयी चिंता व्यक्त केली आणि तातडीने वकिलाच्या प्रकृती विषयी चिंता केली आणि त्याला मदत करण्याची शिफारस केली आणि म्हणाले की तुला काही वैद्यकीय मदत हवी आहे का? मी इथल्या लोकांना सांगून मी तुला दवाखान्यात घेऊन जाऊ शकतो.
या चर्चेदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी उत्तर प्रदेशात घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केला. एका लहान मुलाला कुत्रा चावला होता. या मुलावर उपचार करण्यात आले पण ते योग्य प्रकारे झाले नाहीत. त्यानंतर या मुलाला रेबीज झाला असंही मेहता यांनी सांगितलं.
त्यानंतर या मुलाला रूग्णालयात नेण्यात आलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याचा जीव वाचवण्यासाठी काहीही करता आलं नाही. यानंतर चंद्रचूड यांनीही त्यांचा एक अनुभव सांगितला. दोन वर्षांपूर्वी माझे क्लार्क कार पार्क करत होते, त्यावेळी रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. सर्वोच्च न्यायालयात ही चर्चा सुरु झाल्यानंतर वरिष्ठ वकील विजय हंसारिया यांनी सरन्यायाधीशांना रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांचे हल्ले होण्याच्या ज्या घटना आहेत त्याची दखल घ्या अशी विनंती केली. तसंच लोकांच्या सुरक्षेबाबत काय उपाय योजना केल्या गेल्या पाहिजेत याचे निर्देश दिले जावेत अशी विनंतीही केली आहे.या विनंतीनंतर चंद्रचूड म्हणाले की या प्रकरणाचा विचार नक्की केला जाईल. काय उपाय योजना करता येतील ते आपण पाहू असं म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे जस्टिस केवी विश्वनाथन आणि जेके महेश्वरी यांच्या खंडपीठाने भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत ज्या याचिका येत आहेत त्यासंबंधीही विचार केला जाईल असं म्हटलं होतं. या याचिकांमध्ये केरळ आणि बॉम्बे हायकोर्टाद्वारे अशाच प्रकरणात देण्यात आलेल्या आदेशांचा विचार होईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.LiveLaw ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.