भाजपा खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना दिल्लीतल्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात न्यायालयाने ब्रिजभूषण यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या सर्वसाधारण जामिनावर २० जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सहा महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. याप्रकरणी कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांचाही जामीन मंजूर झाला आहे. दोघांविरोधात महिला कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारींनुसार आरोपत्र दाखल करण्यात आलं आहे. ब्रिजभूषण यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी कुस्तीपटूंनी अनेक दिवस दिल्लीत आंदोलन केलं. मोठ्या लढाईनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचलं आहे.
ब्रिजभूषण सिंह यांचा अंतरिम जामीन न्यायालयाने मंगळवारी मंजूर केला. ब्रिजभूषण सिंह यांच्या वतीने विधीज्ञ राजीव मोहन यांनी न्यायालयात बाजू मांडत जामिनाची मागणी केली होती. राजीव मोहन हे प्रसिद्ध वकील असून ते निर्भया खटल्याच्या वेळी पहिल्यांदा प्रसिद्धीझोतात आले होते. तेव्हा त्यांनी सरकारी वकील म्हणून निर्भयाची बाजू मांडली होती. त्यावेळी राजीव मोहन यांनी दोषींना फाशी व्हावी, अशी मागणी न्यायलयासमोर केली होती. तेच राजीव मोहन आता ब्रिजभूषण सिंह यांची बाजू मांडत आहेत. इंडिया टूडेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
निर्भया प्रकरण हे एक ऐतिहासिक प्रकरण आहे. या प्रकरणाची देशभर चर्चा झाली होती. निर्भया प्रकरणात ४ आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आणि मार्च २०२० मध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावेळीे राजीव मोहन प्रसिद्धीझोतात आले होते.
हे ही वाचा >> सोमय्यांच्या व्हिडीओवरील प्रश्नावर प्रकाश आंबेडकरांचा संताप, दिगंबर साधूंचा…
ब्रिजभूषण यांना दोन दिवसांचा दिलासा
कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात राऊज अवेन्यू न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी मंगळवारी न्यायालयाने ब्रिजभूषण यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आता गुरुवारी (२० जुलै) त्यांच्या सर्वसाधारण जामिनावर सुनावणी होईल. त्यांना २५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर २ दिवसांचा जामीन मिळाला आहे. ब्रिजभूषण यांच्यासह कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांचाही अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. २० जुलै रोजी त्यांच्या नियमित जामिनावर सुनावणी होईल. याप्रकरणी निकाल येईपर्यंत ब्रिजभूषण सिंह अंतरिम जामिनावर असतील.